सामंजस्य बिघडवू नका, दंगली हव्या आहेत काय?; राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वरच्या मुद्द्यावरून फटकारले
बहुसंख्य हिंदू असलेल्या राज्यात हिंदू खतरे में असेल तर कसं होईल?, असा सवाल करतानाच निवडणुका येतील तेव्हा येतील. जेव्हा मी बोलतो तेव्हा तुमचं लक्ष नसतं. तेव्हा हसण्यावारी नेता. निवडणुका जवळ आल्यात अशा गोष्टी घडत जातील, असं राज ठाकरे म्हणाले.
नाशिक : त्र्यंकेश्वर मंदिरातील वादावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारण्यांना चांगलेच फटकारले आहे. अशा प्रकारच्या घटना कशासाठी घडवल्या जात आहेत? याच्यात कुणाला दंगली हव्या आहेत का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतात त्यावर प्रहार करणं गरजेचं आहे. जाणूबुजून काही तरी खोदून काढायचं त्याला काही अर्थ नाही. आतापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर मराठी मुसलमान राहतात तिथे दंगली होत नाहीत, असं सांगतानाच राज्यात काही ठिकाणी सामंजस्य आहे. काही लोकांनी ते बिघडवू नये, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्रात अनेक मशिदी आणि मंदिरे आहेत. तिथे हिंदू-मुस्लिम एकत्र दिसतात. माहीमच्या दर्ग्यात माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल चादर चढवतो. माझ्याकडे अशी अजून उदाहरण आहेत. ही परंपरा सुरू ठेवली पाहिजे. एखादा माणूस दर्ग्यात आला म्हणजे धर्म भ्रष्ट कसा होतो? इतका कमकुवत धर्म आहे का? अनेक मुसलमान मंदिरात येतात. आपल्याच मंदिरात काही जातींना मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ देत नाही. मानसाची बघण्याची वृत्ती कोती आहे. छोटी आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
निर्णय गावकऱ्यांना घेऊ द्या
त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी निर्णय घ्यावा. बाहेरच्यांनी त्यात पडू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. मी ठाणे दौऱ्यावर होतो. तेव्हा अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत मी कलेक्टरशी बोललो. त्यांनी बहुधा एक मशीद हटवली आहे, असं सांगतानाच गडकिल्ल्यांवरील दर्गे हटवले पाहिजे. काय संबंध आहे त्याचा गड किल्ल्यांशी? असा सवाल त्यांनी केला.
जैतापूरला प्रकल्प न्या
यावेळी त्यांनी बारसू रिफायनरीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. जमिनीतील व्यवहारातून होणाऱ्या या गोष्टी आहेत. हजार दोन हजार एकर जमीन पटकन मिळते ही काय गंमत आहे का? याचा अर्थ कोणी तरी जमिनी घेतल्या आहेत. कमी भावात घ्यायच्या सरकारला जास्त भावात विकायच्या हे धंदे आहेत. जैतापूरला काय करणार? ती कंपनी बुडाली. आता काय करणार? जर जैतापूरला जमीन आखून घेतली आहे तर हा प्रकल्प जैतापूरला का नेत नाही? असा सवाल त्यांनी केला.
आम्ही बोलूच नये का?
कर्नाटकातील निवडणूक निकालामुळे देशाच्या राजकारणात बदल होतील काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, एका राज्यावर देशाचा आराखडा नाही मांडू शकत. तसं पश्चिम बंगालमध्येही विरोधात निकाल गेला. वातावरण कसं बदललं ते पाहू. सर्व गोष्टी इंटरेस्टिंग होत आहेत, असं ते म्हणाले. कर्नाटकबाबत मी जी प्रतिक्रिया दिली ते समजून घ्यायला पाहिजे. आम्ही बोलल्यावर टीका होते. म्हणजे उद्या पेपर चालवणाऱ्यांनी अग्रलेख लिहू नये का? यांच्याबाबत बोलायचंच नाही का? यांनी बोललेलं चालतं? असा सवाल त्यांनी भाजपला केला.