नोटाबंदीवर राज ठाकरे यांची सडकून टीका; राज म्हणाले, असं सरकार चालतं का?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नोटाबंदीवर सडकून टीका केली आहे. हा धरसोडीचा निर्णय आहे. आधीच तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर आज ही वेळच आली नसती, असं राज ठाकरे म्हणाले.
नाशिक : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. ही बंदी घालताना नोटा बदलून देण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या नोटाबंदीवर देशभरातून जोरदार प्रतिक्रिया उमटली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तेव्हाच तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती, असं सांगतानाच असं सरकार चालतं का? असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. यावेली त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नोटाबंदीवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. नोटाबंदी झाली त्याचवेळी मी बोललो होतो. हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारून नोटाबंदी झाली असती तर ही वेळ आली नसती. तेव्हा नोटा आल्या त्या एटीएममध्ये जात नव्हत्या. नोट एटीएममध्ये जाईल की नाही याचा विचारही तेव्हा केला नव्हता. असले निर्णय परवडणारे नसतात. उद्या बँकेत पैसे टाकायचे. नंतर नवीन नोट आणणार. असं काही सरकार चालतं का? असे थोडे प्रयोग होतात. मी तेव्हाच या गोष्टी बोललो होतो, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
नाशिकमध्ये पक्ष दिसेल
राज ठाकरे नाशिक दौऱ्यात पक्षाचा आढावा घेणार आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मेळावा घेणार आहेत. पक्षातील बदलाची माहिती नाही. कार्यकर्त्यांशी बोलतो. पक्षाची बांधणी करण्यासाठी आलो आहे. पक्षातील हेवेदावे दूर केले जातील. मी मुंबईला गेल्यावरही पक्ष दिसेल, असं सांगतानाच निवडणुकीत केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचली तरी खूप झाले. नवीन मुद्दे येतील. आमच्या काळात जेवढी कामे झाली, तेवढी त्या आधी आणि नंतरही झाली नाही. ज्यांनी शहरे दत्तक घेतली त्याचं काय झालं? त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही, असंही ते म्हणाले.
शॅडो कॅबिनेट कार्यान्वित होणार
कोरोना पूर्वी मनसेने शॅडो कॅबिनेट जाहीर केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ती शॅडो कॅबिनेट अजूनही आहे. ती कोणत्या एका सरकार विरोधातील नाही. ती जाहीर केल्यावर महिन्यभरात लॉकडाऊन लागला. ती पुन्हा कार्यान्वित होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
गौतमी पाटीलवर बोलण्यास नकार
मनसेकडून गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यावर विचारले असता, त्या कार्यक्रमाशी मनसेचा काहीच संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच गौतमी पाटीलवर अधिक बोलण्यास नकार दिला.