Nanded : नांदेडमधील घटना दुर्दैवी, पहिला अहवाल प्राप्त…; रुग्णमृत्यू प्रकरणावर भारती पवार यांची सविस्तर प्रतिक्रिया
Bharti Pawar on Nanded Civil Hospital Death Case : नांदेडमधील रुग्णमृत्यू प्रकरणावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची सविस्तर प्रतिक्रिया... पहिला अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झालाय. यात नेमकं काय आहे? भारती पवार यांनी सांगितलं आहे. वाचा सविस्तर...
नाशिक | 05 ऑक्टोबर 2023, चंदन पुजाधिकारी : नांदेडमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये एका दिवसात 24 जणांचा मृत्यू झाला. यामुळे महाराष्ट्रभर संताप पाहायला मिळाला. या घटनेमुळे विरोधांनी शिंदे सरकारवर टीका केली. यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नांदेडच्या रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्दैवी घटनेबाबत अहवाल मागितला आहे. या रूग्णांच्या मृत्यूबाबत प्राथमिक अहवाल आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी समिती नेमली आहे चौकशी सुरू आहे. जे रुग्ण होते त्यात काहींचं वय जास्त होतं. तर काही खाजगी हॉस्पिटलमधून रुग्ण आले होते. तिथं औषधसाठा पुरेसा होता. या संदर्भात लवकरच अहवाल येईल, असं भारती पवार म्हणाल्या.
नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाचा अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झाला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ही माहिती दिली आहे. औषधांचा साठा पुरेसा होता. औषधं नसल्याने मृत्यू झाले नाहीत. मृत्यू झालेल्या काही रुग्णांचं वय जास्त होतं. अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयातून इकडे भरती झाले होते. काही नवजात बालक खाजगीत व्हेंटिलेटरवर होती. ते शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रप्त झालेल्या अहवालात प्राथमिक माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. दुसरा सविस्तर अहवाल लवकरच येईल, असं भारती पवार यांनी सांगितलं.
मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट दिली. तिथली परिस्थिती जाणून घेतली. सुविधा मिळतात की नाही, हे पाहिलं. 500 बेडचं हे हॉस्पिटल आहे. औषधं आहे की नाही याबाबत माहिती घेतली. औषध नसतील तर मागणी करा, असं सांगितलं. केंद्र सरकार कडून औषध दिलं जात आहे. त्याचा आढावा घेतला. इमर्जन्सी रुग्ण किती आहे याचा आढावा घेतला, असं भारती पवार म्हणाल्या.
प्रत्येक जिल्ह्याला काही अधिकार असतात. हाफकीनकडून काही औषधांची खरेदी केली जातेय. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून औषध खरेदी करू शकतात. राज्य सरकारने याबाबत सविस्तर आदेश दिले आहेत, असंही भारती पवार म्हणाल्या.