चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, नाशिक | 10 ऑक्टोबर 2023 : नाशिकमध्ये कोट्यावधीचं ड्रग्स सापडलं आहे. यावरून आमदार देवयानी फरांदे या आक्रमक झाल्या आहेत. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. नाशिकचा उडता पंजाब झाला आहे, हे मी सभागृहात बोलतानाच सांगितलं होतं. पोलिसांना 6 महिन्यांपूर्वीचं सगळ्या ड्रग डीलर्सचे नंबर दिले होते. नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना सुरू आहे हे मी सभागृहात सांगितलं होतं. पण पुढे त्यावर कारवाई झाली नाही. ही कारवाई का होत नाही?, असा सवाल देवयानी फरांदे यांनी केला आहे.
पोलिसांना या प्रकरणाची कल्पना दिली. पण पोलिसांनी कारवाई का केली नाही? याचं उत्तर द्यावं. नाशिकमध्ये पोलिसच ड्रगच्या अधीन आहेत. हे मला देखील कळालं. शाळा,महाविद्यालय,संपूर्ण शहरात ड्रग्स चा बाजार सुरू असताना पोलीस काय करत आहेत. ड्रग्स हँडलरचा सिडीआर का तपासला नाही? नाशिक शहरात एम.डी ड्रग्समुळे अनेक खून आणि आत्महत्या झाल्या. मुंबईचे पोलीस नाशिकमध्ये येऊन कारवाई करतात. तर नाशिक पोलिसांना उत्तर द्यावं लागेल, असंही देवयानी फरांदे म्हणाल्या आहेत.
नाशिक ड्रग्स प्रकरणावर विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येतेय. त्यालाही फरांदे यांनी उत्तर दिलं आहे. विरोधकांनी या विषयावर राजकारण करू नये. आपल्याला आमदारांचं नाव माहिती असेल तर जाहीर करा. हा नाशिकच्या तरुण भविष्याचा प्रश्न आहे. यावर राजकारण करू नका, असं म्हणत देवयानी फरांदे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
एमडी ड्रग्स तयार होणाऱ्या कारखान्यात पोलिसांनी धाड टाकली. यात शेकडो कोटींपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यानंतर एकच खळबळ उडाली. विरोधी पक्षाकडून यावर टीका करण्यात आली.
दोन दिवसात 500- 600 कोटींचं ड्रग्ज सापडतं. माझ्यासाठी सुद्धा ही धक्कादायक बाब आहे. एकाच गावात जिल्ह्यात एकाच शहरात हे ड्रग्ज सापडतं. औषध बनवण्याचा कारखाना असेल असं दाखवलं असेल. तर त्या डिपार्टमेंटच्या लोकांना कसं हे समजलं नाही? असं सवाल उपस्थित करत छगन भुजबळ यांनी या ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.