Nashik | मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या तारखांमध्ये ऐनवेळी बदल; आता जूनमध्ये आयोजन, कारण काय?
उदगीरमध्ये 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 22 ते 24 एप्रिल दरम्यान होणार आहे. या संमेलनाचे निमंत्रक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, उदगीर ही संस्था आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची निवड झाली आहे. लातूर जिल्ह्यात होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे.
नाशिकः गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत असलेले नाशिक (Nashik) येथे होणारे 14 वे अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) अखेर दोन महिने पुढे ढकलण्यात आले आहे. अखिल भारतीय मुस्लिम (Muslim) मराठी साहित्य व सांस्कृतिक संस्था व मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 ते 27 या तीन दिवशी हे संमेलन होणार होते. मात्र, आता हे संमेलन जूनमध्ये होणार असून, त्या तारखा लवकर जाहीर करू, अशी माहिती स्वागताध्यक्ष तन्वीर खान (तंबोली) यांनी दिली आहे. मार्च ते एप्रिल महिन्यात विविध परीक्षा आहेत. त्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नाही. त्यामुळे पुरेशा प्रमाणात बसगाड्या सुरू नाहीत. महत्त्वाचे म्हणजे एप्रिल ते मे महिन्यादरम्यान रमजानचा महिना येतो. हे सारे ध्यानात घेता रसिक आणि सर्वसामान्यांची अडचण होऊ नये म्हणून हे संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. आता जून महिन्यात हे संमेलन होणार असून, त्याच्या तारखा लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती तंबोली यांनी दिली आहे.
संमेलन वादामुळे चर्चेत
नाशिकमध्ये तब्बल 22 वर्षांनी हे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी 2000 मध्ये हे संमेलन नाशिक येथे झाले होते. सोलापूर, नागपूर, रत्नागिरी, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे, पनवेल, नवी मुंबई, मुंबई येथेही ही संमेलने झाली आहेत. नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन हे भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार आहे. संमेलनात तीन दिवस विविध परिसंवाद, कविसंमेलन, चर्चासत्र असे अनेक कार्यक्रम होणार आहेत. या संमलेनाला रसिकांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मात्र, मुस्लिम मराठी साहित्य संमेलनही गेल्या अनेक दिवसांपासून विविध वादांमुळे चर्चेत आहे. त्यामुळेच हे संमेलन पुढे ढकलले का, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.
22 एप्रिलला उदगीर संमेलन
दरम्यान, दुसरीकडे उदगीरमध्ये 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 22 ते 24 एप्रिल दरम्यान होणार आहे. या संमेलनाचे निमंत्रक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, उदगीर ही संस्था आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची निवड झाली आहे. लातूर जिल्ह्यात होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. तसा उदगीर हा सीमावर्ती भाग. या परिसरात मराठी, कन्नड, उर्दू आणि तेलगू या भाषा बोलल्या जातात. या संमेलनात या चारही भाषांचा सन्मान होईल, अशा पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे, अशी माहिती निमंत्रकांनी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही संमेलनाची रसिकांना उत्सुकता आहे.
इतर बातम्याः