महायुती सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागणार?; छगन भुजबळ म्हणाले, हा कोट…
Chhagan Bhujbal on Ministership : राज्यात महायुती सरकार सत्तेत आलं आहे. सरकारचा शपथविधी अद्याप झालेला नाही. पण या सरकारमध्ये मंत्रिपदी कुणा- कुणाला संधी मिळणार? याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांच्या नावाची देखील चर्चा पाहायला मिळतेय. वाचा सविस्तर बातमी...
येत्या पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या नव्या सरकारमध्ये कुणा-कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशातच अनुभवी नेत्यांवर पुन्हा मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील नव्या सरकारमध्ये मंत्री असतील, अशी चर्चा होत आहे. आघाडी सरकार आणि महायुती सरकारमधील मंत्रिपदाचा अनुभव भुजबळांच्या गाठीशी आहे. यावर स्वत: भुजबळांनी मिश्किल टिपण्णी केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
भुजबळांच्या कोटची नाशिकमध्ये चर्चा
नाशकात भुजबळांच्या कोटची चर्चा होत आहे. भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. छगन भुजबळ यांनी आज घातलेल्या कोटाची चर्चा होतेय. छगन भुजबळ यांनी आज घेतलेल्या कोटावर मुश्किल टिप्पणी केली आहे. मंत्रिमंडळ नाही तर नाशिकच्या थंडीमुळे कोट घातला आहे. नाशिकपासून पुढे गेल्यानंतर कोट काढून टाकणार आहे, असं भुजबळांनी म्हटलंय.
मंत्रिपदाबाबत भुजबळ काय म्हणाले?
मंत्रिमंडळात छगन भुजबळांचाही समावेश असेल, असं बोललं जात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता तुमच्याकडून मी ऐकतोय मला देखील काहीजणांनी नाव पाठवलेत. पण हे सगळं अंदाज आहेत. आमचे नेते अजित दादा आहेत. ते स्वतः फोन करून सांगितलं तेव्हा ते खरं… आमचे प्रांत अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष दिल्लीमध्ये आहेत. त्यांना इकडे बोलावण्यापेक्षा दादा दिल्लीला गेले आहेत, असं भुजबळांनी म्हटलं आहे.
महायुती सरकारमध्ये जास्त मंत्रिपदं कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार? या प्रश्नावही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला काही कल्पना नाही. अजितदादांसोबत आमची बैठक झाली. तेव्हा स्टाईकरेट बाबत विषय झाला. एक नंबर भाजप आहे. तर दोन नंबरला आम्ही आहोत, असं भुजबळांनी म्हटलं. नवीन चेहऱ्यांना संधी नेहमी देण्यात येते. यावेळी जरा अडचण जास्त आहेत. दर वेळी 160 असतात यावेळी जास्त आमदार आहेत. सर्व पक्षांमध्ये नवीन जुने चेहरे येतील, असं भुजबळ म्हणालेत.