संभाजी भिडे यांना अटक कराच, ते बहुजनांच्या पोरांना भडकवतायेत; छगन भुजबळ आक्रमक
Chhagan Bhujbal on Sambhaji Bhide : दुसरं कुणी बोललं असतं तर आतापर्यंत अटक झाली असती मग संभाजी भिडे यांना अटक का नाही?; छगन भुजबळ यांचा सवाल
नाशिक : माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. संभाजी भिडे यांना अटक व्हायलाच हवी. त्यांनी जे म्हटलं, हे जर दुसरं कोणी म्हटलं असतं. तर एव्हाना देशद्रोही म्हणून अटक झाली असती. संभाजी हे नाव वापरून ते बहुजनांच्या पोरांना भडकवत आहे, असं छगन भुजबळ म्हणालेत.
संभाजी भिडे यांचं वक्तव्य काय?
संभाजी भिडे यांनी भारतीय स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. याच दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे सर्वांनी या दिवशी उपवास करावा. या दिवशी दुखवटा पाळावा, असं संभाजी भिडे म्हणालेत.
संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. छगन भुजबळ यांनी ही मागणी केली आहे.
भुजबळांचं सरकारवर टीकास्त्र
जळगाव शासन आपल्यादारी लोकांना बळजबरी बोलवल्याचा आरोप आहे. मला काही फारसं माहित नाही. पण अशा प्रकारच्या अटी ठेवणं योग्य नाही. एक दिवस तुमच्यासाठी यायचं म्हणजे, गरीब लोकांची रोजी रोटी बुडते, असं म्हणत भुजबळांनी राज्य सरकारवर आरोप केलेत.
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही भागांची पाहणी केली. त्यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या पावसात कुठल्याही शहरात रस्ते तुंबण्याचे प्रकार घडतात. यावर शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. ट्रॅफिक पोलिसांना खड्डा कुठे आहे, याची माहिती असते. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना ताबडतोब कल्पना द्यावी. मुंबईतला काही भाग बशीसारखा आहे, त्यामुळे पाणी साचतं. गटार जर नीट साफ केली नाही, तर असे प्रश्न उद्भवतात. मुख्यमंत्री फिरत आहे. ही त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट आहे, असं ते म्हणालेत.
पुण्यात हे काय चाललंय काय? महात्मा फुले यांनी सगळ्यांच्या शिक्षणासाठी काम केलं. अशा या पुण्यभूमीत काय चालू आहे? पोलीस आयुक्त काय करतात? यावर कडक कारवाई करा. न्यायव्यवस्थेने देखील जरा सुद्धा दया दाखवता कामा नये, असं म्हणत भुजबळांनी पुण्यात तरूणीवर झालेल्या कोयता हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीची दिल्लीत बैठक आहे. यावर बोलताना मला कल्पना नाही, मला त्या कार्यकारणीचं आमंत्रण नाही. मी काही राष्ट्रीय कार्यकारिणीत नाही, असं भुजबळ म्हणालेत.
BRS पक्ष युपीएचा भाग होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर मी काही राष्ट्रीय नेता नाही. राष्ट्रीय प्रश्नांची माझी जाण खूप कमी आहे. मला काही त्यातली कल्पना नाही, असं त्यांनी म्हटलं.