पक्ष हातातून हिसकावून घेतल्याच्या पवारांच्या आरोपांना छगन भुजबळांचं उत्तर; म्हणाले, साहेब तुम्ही…
Chhagan Bhujbal on Sharad Pawar : आज बारामतीत बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाबाबत आलेल्या निर्णयावर भाष्य केलं. हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचं शरद पवार म्हणाले. त्यांच्या या टीकेला अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. ते काय म्हणाले? वाचा...
उमेश पारिक, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 17 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीत आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर असहमती दर्शवली. ज्या व्यक्तीने पक्ष उभा केला. त्या व्यक्तीच्या हातून पक्ष हिरावून घेतला गेला आहे. या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो आहोतस असं शरद पवार म्हणाले. त्यांच्या या टीकेला अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. नाशिकमध्ये बोलताना भुजबळांनी पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा कायद्याला धरून आहे की नाही, त्याचासाठी ते सुप्रीम कोर्टात जाताहेत ना… सुप्रीम कोर्टात न्यायाधिश बसलेले आहेत. कायदेपंडित बसलेले आहेत. ते ठरवतील. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय उत्तर द्यायला पाहिजे, काय निर्णय घ्यायला पाहिजे ते सांगतील ना… सुप्रीम कोर्टात जातातच आहे ना, तर जा…, असं म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
आव्हाडांच्या टीकेला भुजबळांचं उत्तर
ओबीसी निधीवरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यावरही छगन भुजबळ बोलले आहेत. मला जर त्यांनी डिटेल्स दिली. तपशील दिला तर विचारता येईल. मला तर तसे काहीही माहीत नाही. त्यांच्याकडे जर एखादी फाईल दिली तर लगेचच ती मार्गी लागते, ते ठेवत नाही, असं भुजबळ म्हणाले.
जरांगेंच्या उपोषणावर टीका
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. त्यावर भुजबळांनी भाष्य केलंय. त्याची संस्कृती आहे ती… मोठा नेता आहे तो.. तिथे झोपणार अन् तिथून सांगणार हे झालं पाहिजे अन् ते झाले पाहिजे. काय चाललंय काय, दुकाने बंद करा..गाड्या जाळा… हे काय टोळ्यांचे राज्य आहे का? बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेले हे लोकशाहीचे महाराष्ट्र राज्य आहे. ते मंत्र्यांनी अन् पोलिसांनी दाखवून दिले पाहिजे. कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. कायदा जर कुणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याचेवर कडक कारवाई केली पाहिजे. तो लहान नेता असो वा मोठा नेता असून किंवा कोणत्याही समाजाचा नेता असो. काहीही मुद्दा येत नाही, असं भुजबळ म्हणाले.