Nashik Corona| कोरोना लस घेतल्याशिवाय सप्तश्रृंगीचे दर्शन नाही; इतरही नियम कडक, जरूर जाणून घ्या…!
वणी येथील सप्तश्रृंगी मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी ई पास आणि ऑनलाईन दर्शनाचा लाभ भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
नाशिकः कोरोनाचे अत्यंत वेगाने वाढणारे रुग्ण, त्यात भयंकर अशा ओमिक्रॉन विषाणूची भीती यामुळे प्रशासन दक्ष झाले आहे. राज्यभरातील भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या वणी येथील सप्तश्रृंगी मंदिरात भाविकांना लस घेतल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
नेमका निर्णय काय?
नाशिकजवळच्या वणी येथील सप्तश्रृंगी मंदिराच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. मात्र, येथे वाढणारी गर्दी आणि कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता मंदिर प्रशासन दक्ष झाले आहे. कोरोना लसीचा किमान एक डोस घेतल्याशिवाय आता भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच 10 पेक्षाकमी आणि 65 पेक्षा अधिक वयाच्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णयही घेण्यात आला आहे. शिवाय मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी ई पास आणि ऑनलाईन दर्शनाचा लाभ भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. यापूर्वी नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमेच्या काळातही नियम कडक करण्यात आले होते.
प्रशासन दक्ष
नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे कुठेही पालन केले जात नाही. ओझरमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदाराने बैलगाडा शर्यत घेऊन हजारो लोकांची गर्दी जमा केली. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ही शर्यत पार पाडली. तोच कित्ता गिरवत दिंडोरी तालुक्यातील लाखमापूर येथेही हजारो जणांची गर्दी जमवून बैलगाडा शर्यत पार पडली. याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये ‘शिवसेना मनामनात शिवबंधन घराघरात’ हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि एका आमदाराच्या मुलाचा विवाह सोहळा झाला. यावेळीही कोरोना नियमांचा फज्जा उडवण्यात आला. हा गाफीलपणा येणाऱ्या काळात भोवण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन तरी तूर्तास दक्ष झाले आहे.
रुग्णसंख्या 691 वर
नाशिकमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये अत्यंत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. सध्या जिल्ह्यात तब्बल 691 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील तब्बल 438 रुग्ण आहेत. विशेष म्हणजे कुठेही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात नाही. नागरिक मास्क वापरत नाहीत. यामुळेच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे.
इतर बातम्याः
Nashik|मालेगावमध्ये कोरोना लसीकरण नोंदणीत घोळ, चौकशीपूर्वीच 10 शिक्षकांचे निलंबन रद्द
Property Tax|नाशिकमध्येही मालमत्ता करमाफी होण्याची शक्यता; पालकमंत्री छगन भुजबळांनी काय दिले संकेत?
Malegaon scam| कृषिमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यात 89 कोटींचा अनुदान वाटप घोटाळा