नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातली गुन्हेगारी काही केल्या थांबायला तयार नाही. आता बागलाण तालुक्यातल्या ठेंगोडा येथे तब्बल 14 लाखांची घरफोडी झालीय. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक हवालदिल झालेत. चोरट्यांनी दिनेश पगारे यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केलीय. याप्रकरणी सटाणा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक खांडवी, एस. डी. पी.ओ. सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक अनमूलवार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमूलवार यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी खबरे कामाला लावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दरोडे, चोरीच्या घटनांनी नागरिक हादरून गेलेत. विशेषतः नाशिकमध्ये तर एकामागून एक तीन खून (Murder) पडले. यामुळे एरवी थंड आणि शांत असणाऱ्या नाशिकच्या नावाला या घटनांनी बट्टा लागताना दिसत आहे.
कसा मारला डल्ला?
ठेंगोडा गावातले दिनेश पगारे हे महाराष्ट्र बँडचे संचालक आहेत. त्यांचे आण्णा भाऊ साठे नगरात घर आहे. पगारे यांच्या नातेवाईकांकडे एक कार्यक्रम होता. त्यासाठी पगारे आपल्या कुटुंबासह परगावी गेले होते. चोरट्यांनी हीच संधी साधली. त्यांच्या घराच्या मागील बाजच्या जिन्यातून प्रवेश केला. लाकडी दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील सामानाची उचकापाचक केली. रात्री रोख रखमेसह सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पसार झाले. पगारे कुटुंब कार्यक्रम करून परतले असता हा सारा प्रकार उघड झाला आहे.
कोणते दागिने लंपास?
चोरट्यांनी कपाटात ठेवलेले पाच तोळ्याचे सोन्याचे ब्रासलेट, पाच तोळे सोन्याचे गोफ, दोन तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, दोन तोळे वजनाची सोन्याची एक ठुशी, एक तोळे वजनाची सोन्याची एक ठुशी, तीन तोळे वजनाची सोन्याची मंगल पोत, सहा ग्रॅमची सोन्याच्या मण्याची माळ, सात ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार असा जवळपास चौदा लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यांनी आपले खबरे कामाला लावले आहेत. पोलिस पथकांनी जिल्हा पिंजून काढायला सुरुवात केलीय. लवकरच या चोरट्यांना बेड्या ठोकू, असा निर्धार केलाय.