नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) पोलीस (Police) जावयाने सासऱ्याचा खून (Murder) केला असून, हल्ल्यात सासू, पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेने एकच खळबळ उडालीय. निवृत्त सांगळे असे मृत सासऱ्याचे नाव असून, आरोपी सूरज उगलमुगले फरार आहे. या भांडणाची वेळेवर माहिती देऊनही पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे उपनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब वाघ आणि नातेवाईकांनी अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे केली. तसेच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार दिला. मात्र, पोलीस उपअधीक्षकांनी मध्यस्ती करत त्यांचा राग शांत केला. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, आरोपी सूरज उगलमुगले हा मनमाड येथे दंगा नियंत्रण विभागात कर्तव्यावर आहे. तो उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. सूरज आणि पत्नी पूजामध्ये घरगुती कारणामुळे वारंवार भांडणे होत असत. पूजा माहेरी दोडी (ता. सिन्नर) येथे गेली होती. सूरज तिथे गेला. त्याने पत्नीशी भांडण सुरू केले.
सूरजने सुरू केलेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्याने सोबत आणलेल्या शस्त्र्याने सासरे निवृत्ती दामोदर सांगळे, सासू शिला निवृत्ती सांगळे आणि पत्नी पूजावर हल्ला केला. सूरजच्या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना नाशिकरोड येथील सिन्नर फाटा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या उपचारात सासरे निवृत्ती सांगळे यांचा मृत्यू झाला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नी पूजाची प्रकृतीही नाजुक आहे. पूजाच्या आईवरही उपचार सुरू असल्याचे समजते. सूरज आणि पूजाला एक चार वर्षांचा मुलगा आहे. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ माजली असून, नातेवाईकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही नातेवाईक करत आहेत.