नाशिकः नाशिकच्या (Nashik) येथील विवाहितेशी सोशल मीडियावरून (Social media) मैत्री करून बलात्कार केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, संशयिताला अजूनही अटक नाही. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या एका विवाहितेची 18 ते 28 डिसेंबर 2021 च्या दरम्यान शेअर चॅट अॅपच्या माध्यमातून एका तरुणासोबत ओळख झाली. हळूहळू दोघांच्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. तरुणाने वेळोवेळी विवाहितेशी संवाद साधला. फोनवरून बोलणेही वाढवले. त्यानंतर त्याने विवाहितेला भेटायला बोलावले. पर्यटनाच्या नावाखाली शिर्डी, त्र्यंबकेश्वर, वणी आदी ठिकाणी दोघेही फिरून आले. या दौऱ्यात त्यांनी अनेक फोटो काढले. विवाहितेने या सोशल मीडियावरील मित्रासोबत सेल्फीही काढली. नेमका याचाच लाभ घेत त्याने विवाहितेला ब्लॅकमेल करणे सुरू केले.
तरुणाने याच फोटोचा वापर हत्यार म्हणून केला. हे फोटो आणि विशेषतः सेल्फी तुझ्या नवऱ्याला पाठवतो अशी धमकी विवाहितेला दिली. त्याने विवाहितेला ब्लॅकमेल करत बोलावून घेतले. त्यानंतर विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास पुन्हा धमकी दिली. संशयित तरुण मुंबईचा असल्याचे समजते. हा त्रास वाढल्यानंतर विवाहितेने शेवटी भद्रकाली पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. डी. पवार या करत आहेत.
सोशल मीडियावरून ओळख निर्माण करून महिलांवर अत्याचार केल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हे प्रकार टाळता येतात. मात्र, त्यासाठी महिलांनी दक्ष असायला हवे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही मित्र झाला, तरी त्याला स्वतःचा पर्सनल मोबाइल क्रमांक शेअर करू नका. प्रत्यक्षात भेट कधी झाली तरीही मर्यादा बाळगून रहा. प्रत्येक मित्र वाईट असोतच असे नाही. मात्र, प्रत्येक मित्र चांगला असतो असेही नाही. हे पाहता अशा मित्रात गुंतत जाताना थोडे भान जरूर ठेवा.