गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्याने भुजबळ नाराज?; ‘भुजबळ फार्म’ भेटीनंतर दादा भुसे यांची पहिली प्रतिक्रिया
Dada Bhuse Meet Chhagan Bhujbal after Hemant Godse Candidacy declared : नाशिक लोकसभा मतदारसंघात घडामोडींना वेग आला आहे. दादा भुसे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. दादा भुसे काय म्हणाले? वाचा सविस्तर...
नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असणारे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्री दादा भुसे यांनी छगन भुजबळांची भेट घेतली. या भेटीनंतर दादा भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधला.भुजबळ नाराज आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा विनंती आहे उगाच आपण काहीतरी नवीन प्रश्न निर्माण करू नयेत. आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राज्य आहे आणि म्हणून असे कुठलेही विषय नाहीत. भुजबळसाहेब ज्येष्ठ नेते आहेत. मी सकाळी पण आपल्याला बोललो की, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण महायुतीचे काम करतोय. आमचा उमेदवार निवडून येण्यासाठी कामकाज करू, असं दादा भुसे म्हणालेत.
छगन भुजबळ यांच्याशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. छगन भुजबळसाहेबांचा शिवसेनेच्या कालावधीपासून तर आत्तापर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये त्यांचा जो प्रवास आहे. गप्पा गोष्टींमध्ये अनेक विषय रंगले, असंही दादा भुसे म्हणाले.
गोडसे का आले नाहीत?
हेमंत गोडसे ‘भुजबळ फार्म’ इथं भुजबळांना भेटण्यासाठी आले नाहीत, यावर दादा भुसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी विनंती आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात होतो. उमेदवारी घोषित केल्यानंतर ते देवीचा आणि राम मंदिरामध्ये दर्शनाच्यासाठी गेलेले आहेत. भुजबळसाहेबांचा वेळ आम्ही घेतलेला होता. आधीच घेतलेला होता. नंतर काही गोळ्या औषध घेऊन त्यांना विश्रांतीचा त्यांचा वेळ असतो. परंतु वेळ घेतलेला असल्यामुळे आम्ही थेट त्याच्यासाठी आलो, असं दादा भुसे म्हणाले.
शांतिगिरी महाराजांबाबत म्हणाले…
शांतिगिरी महाराजांना विनंती आवाहन असणार आहे. एका विचारावर काम करणारे आपण सर्वजण आहोत. शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे साहेबांना त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावे त्यांनी अनुमोदन द्यावे. मला विश्वास आहे की शांतिगिरी महाराज त्याठिकाणी शिवसेना महायुतीच्या उमेदवाराला आशीर्वाद देतील, असं दादा भुसे म्हणालेत.
छगन भुजबळ यांचा राजकीय मूळ प्रवास शिवसेनेतून झालेला आहे. शिवसैनिकाच्या पासून शाखाप्रमुखाच्या पासून प्रवास आहे. आज नेमका वेळ होता आणि त्याच्यामुळे जुन्या काळातल्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. कोणाला तुम्ही त्यांना विचारा या क्षणाला विचारा उलट उलट या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा मार्गदर्शन त्यांची सूचना त्याप्रमाणे सगळे निर्णय झालेले आहेत, असं दादा भुसेंनी सांगितलं.