नाशिकः नाशिकच्या (Nashik) अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या करन्सी नोटप्रेसच्या (Currency Note Press) आवारात गुरुवारी अचानक आग (Fire) लागल्याने खळबळ उडाली. या ठिकाणी चलनी नोटांची निर्मिती केली जाते. नोट प्रेसच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाच्या परिसरात गवताला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. सध्या अग्निशमन दलाच्या माध्यमातून ही आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. नाशिकमध्ये सिक्युरिटी नोट प्रेसची स्थापना 1924 मध्ये ब्रिटिशांनी केली होती. 1928 मध्ये पहिल्यांदा 5 रुपयांची नोट या नोट प्रेसमध्ये छापण्यात आली. 1980 पर्यंत सिक्युरिटी प्रेसमध्येच नोटा छापल्या जात होत्या. 1980 नंतर करन्सी नोट प्रेसमध्ये नोटा छपाईला सुरुवात झाली. करन्सी नोटप्रेसमध्ये 5, 10, 20, 50, 100, 200, 500 रुपयांच्या नोटा छापल्या जातात. वर्षाला सरासरी 4 हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात. त्यामुळे हे ठिकाणी सर्वच बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.
कशामुळे लागली आग?
करन्सी नोट प्रेसमध्ये आज लागलेल्या आगीचे स्पष्ट कारण अजून तरी समजलेले नाही. कोणी सिगारेट वगैरे ओढून फेकली होती की, अन्य काही कारण आहे, हे पुढे आलेले नाही. मात्र, तूर्तास तरी या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. सुरुवातीला जिथे आग लागली होती तिथे मोठ्या प्रमाणात गवत, कचरा होता. सध्या उन्हाची तीव्रता वाढलीय. यामुळेही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त होतेय.
आग लागण्याची कारणे?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा आग तयार होते. आग नेमकी कोणत्या कारणाने लागू शकते याचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. जंगलांमध्ये झाडांना आग लागणे हे नैसर्गिक असून शकते. इथे झाडे आणि फांद्यामध्ये घर्षण झाल्याने उष्णता निर्माण होते आग लागते. घरात जर आग लागली तर त्याचे कारण निष्काळजीपणा असून शकतो. गॅस चालू असणे, वीजेचा शॉक सर्कीट होणे, स्टोव्हचा वापर यामुळे आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पेट घेणारी रसायने, पेट्रोलियम पदार्थ, विजेंच्या तारांची चुकीच्या पद्धतीने मांडणी केली तरीदेखील आग पेटते. एखाद्या घरात , कंपनीत किंवा इतर कुठेही पेट घेणाऱ्या वस्तू अस्तव्यस्त पडल्या असतील आणि त्याचा आगीशी संबंध आला तर त्याने मोठे आगीचे लोळ पसरतात. अशात सिगारेट ओढून कुठेही फेकणे, सार्वजनिक ठिकाणी ती न विझवता फेकण्यामुळे अनेक आगीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.