Nashik: अंत्यसंस्कारास जागा मिळेना, शेवटी ग्रामपंचायतीसमोर दिला अग्निडाग; प्रकरण काय?
खडकजांब गावात तीन स्मशानभूमी असूनही, त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे येथील गावकऱ्यांना स्वतःच्या शेतात अथवा मिळेल त्या जागेवर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. तब्बल पाच वर्षांपासून हीच स्थिती आहे.
नाशिकः इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, या जगण्याने छळले होते, या कवितेच्या ओळी अनेकांनी अनेकदा ऐकल्या असतील. आता मात्र, मरणाने सुद्धा छळले होते, असा प्रत्यय नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील खडकजांब येथे एका कुटुंबाला आपल्या घरातील आप्तेष्टावर अंत्यसंस्कार (Funeral) करताना आला. त्यामुळे त्यांच्यावर चक्क ग्रामपंचायतीसमोर (Gram Panchayat) सरण रचून अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ओढावली. खडकजांब गावात दोन स्मशानभूमी असूनही, त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे येथील गावकऱ्यांना स्वतःच्या शेतात अथवा मिळेल त्या जागेवर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. तब्बल पाच वर्षांपासून हीच स्थिती आहे. आदिवासी कुटुंबातील एका तरुणाच्या अंत्यविधीसाठी ती सुद्धा जागा मिळाली नाही. त्यामुळे कुटुंबाने नाइलाजाने चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरण रचत चितेला अग्निडाग दिला. या प्रकाराबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, प्रशासन नेमके करते काय, असा सवाल विचारला जातो आहे.
नेमके घडले काय?
खडकजांब येथील अमोल अशोक कोकाटे या आदिवासी तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याला वाटले असेल आपण सुटलो. मात्र, त्याची इथूनच फरफट सुरू झाली. गावात दोन स्मशानभूमी आहेत. मात्र, 2017 पासून सुरू असलेल्या वादामुळे त्या बंद आहेत. यावर तोडगा म्हणून अमोलच्या कुटुंबानी सरकारी कार्यालयात फेऱ्या मारल्या. अंत्यसंस्कारासाठी जागा देण्याची विनंती केली. त्यांनी त्यासाठी चक्क दहा तास या कार्यालयात घालवले. मात्र, येथील अधिकाऱ्यांनी हात वर केले. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी अखेर अमोलचा मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणला आणि येथेच अंत्यसंस्कार उरकले.
स्मशानभूमीचा वाद काय?
खडकजांब गावामध्ये दोन स्मशानभूमी आहेत. मात्र, यातील एका जागेप्रकरणी न्यायालयात वाद सुरू आहे. अनेकांनी ही जागा आपली असल्याचा दावा केलाय. त्यामुळे नागरिकांनी आंदोलन करूनही ही जागा अंत्यसंस्कारासाठी सध्या उपलब्ध नाही. शिवाय गावातील दुसऱ्या स्मशानभूमीच्या जागेवर एका बांधकाम व्यावसायिकाने कब्जा केला आहे. ही आपली जागा आहे म्हणत येथे तारेचे कुंपन मारले आहे. त्यामुळे गावात कोणी वारले, तर त्याच्यावर शेतात अंत्यसंस्कार करावा लागतो. मात्र, अमोलला शेत नव्हते. त्यामुळे त्याच्यावर ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी होत आहे.
इतर बातम्याः