तुतारीचा गमछा घालून गोकुळ झिरवळ शरद पवार गटाच्या व्यासपीठावर; पहिली प्रतिक्रिया काय?
Gokul Narhari Zirwal in Shivswarajya Yatra : नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मंचावर आज पाहायला मिळाले. शिवस्वराज्य यात्रेत ते सहभागी झाले होते. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलं. वाचा सविस्तर...
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मंचावर पाहायला मिळाले. गळ्यात तुतरीचा गमछा घालून नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मंचावर उपस्थित होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सध्या सुरु आहे. या यात्रेत गोकुळ झिरवळ सहभागी झाले. त्यामुळे गोकुळ यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटातील पक्षप्रवेश फिक्स झाल्याचं दिसत आहे. राजकीय वर्तुळात होत असलेल्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.
गोकुळ झिरवळ काय म्हणाले?
गोकुळ झिरवळ यांनी काही दिवसांआधी जयंत पाटील यांची भेट घेतली होती. ही भेट मीच घ्यायला लावली होती, असं नरहरी झिरवळांनी म्हटलं होतं. त्यावर गोकुळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मला पाठवलं होतं की नाही, यावर बोलणं उचित नाही. पण या ‘शिवस्वराज्य यात्रे’ त सहभागी होण्याचा निर्णय माझा स्वत: चा आहे, गोकुळ झिरवळ यांनी म्हटलं आहे.
दिंडोरीमधून लढण्यासाठी मी इच्छुक आहे. पण पक्ष आणि महाविकास आघाडी ज्याला उमेदवारी देईल. त्याचा आम्ही प्रचार करू. त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. राजकीय दृष्ट्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहू, असं गोकुळ झिरवळ म्हणाले. गोकुळ झिरवळ शरद पवार गटाच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. ‘शिवस्वराज्य यात्रे’ त गोकुळ सहभागी झाले आहेत. शिवस्वराज्य यात्रेच्या रॅलीतही गोकुळ झिरवळ सहभागी झाले होते. त्यामुळे गोकुळ झिरवळ शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
गोकुळ झिरवळ यांनी ‘शिवस्वराज्य यात्रे’साठी नाशिकमध्ये बॅनरबाजी केली आहे. ठिकठिकाणी स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याचा अर्थ त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. गोकुळ यांच्या प्रवेशाबाबत चर्चा झालेली नाही. त्याबाबत आमचं काही बोलणं झालेलं नाही. त्यांनी उमेदवारी मिळावी, यालासाठी अर्ज केला आहे. पण पक्षाने अजून उमेदवार ठरवलेला नाही, असं जयंत पाटील म्हणाले.