नाशिकः नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रसिद्ध असणाऱ्या जळगाव जिल्हा सहकारी दूध (Milk) उत्पादक संघाने दुधाच्या किमती लिटरमागे दोन रुपयांनी वाढवल्या आहेत. संघाचा विकास गोल्ड हा दुधाचा ब्रँड लोकप्रिय आहे. विकास गोल्डच्या किमतीमध्ये आता लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अर्धा लिटर दूधाची पिशवी आता एक रुपयांनी महाग झाली असल्याचे संघाच्या विक्री व्यवस्थापकांनी परिपत्रक काढून कळवले आहे. सध्या 31 रुपयांना अर्धा लिटर दुधाची पिशवी मिळत आहे. जिल्ह्यानुसार या किमतीत बदल होऊ शकतो. दरम्यान, दुसरीकडे एक मार्चपासून अमूलनेही आपल्या दूध दरात वाढ केली आहे. ही वाढही प्रति लिटर दोन रुपयांची आहे. अहमदाबाद (Ahemadabad) आणि सौराष्ट्रा अमूल गोल्ड दुधाची किंमत 30 रुपये प्रति अर्धा लिटर, तर अमूल ताजा दुधाची किंमत 24 रुपये प्रति अर्धा लिटर, तर अमूल शक्तीची किंमत 27 रुपये प्रति अर्धा लिटर आहे.
दूध संघाची झेप भारी
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाची 1971 मध्ये स्थापना झालीय. कोरोना काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत घट झाली होती. त्यामुळे संघ चिंतेत होता. मात्र, आता ही विक्रीही पूर्ववत झालीय. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच दूध संघाने सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. हे औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पाच लाख लिटर क्षमतेच्या नवीन आधुनिक दूध प्रक्रिया प्लांट आणि नवीन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. संघाकडून दूध, तूप, तही, ताक, श्रीखंड, लस्सी अशा दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केली जाते. सध्या संघाच्या 37 कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या ठेवी आहेत.
दुग्धजन्य पदार्थ महागणार
दुधाच्या किमतीत वाढ झाल्याने अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही आता वाढण्याची शक्यता आहे. दूध महाग झाल्यामुळे चहा, कॉफी, मिठाई आणि चॉकलेटशिवाय तूप, पनीर, लोणी, चीज, लस्सी, आईस्क्रीम आणि ताक यांचे भावही वाढतील. अशा परिस्थितीत दुधाच्या वाढत्या किमतींबरोबरच सर्वसामान्यांच्या अर्थिक बजेटला आणखी एक झटका बसला आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. याचाही फटका सामान्यांना बसणार आहे.