Nashik | रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, संबंधित ठेकेदारांना ब्लॅकमध्ये टाकण्याचे आदेश…
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून महापालिका आयुक्त पुलकुंडवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कारण गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनावर नागरिक रोष व्यक्त करत आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीयं.
नाशिक : नाशिक (Nashik) शहरामध्ये रस्त्यांचे तीन तेरा वाजले आहेत. पावसामध्ये रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाल्याचे चित्र शहरात बघायला मिळते. रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि परिणामी अपघात होत आहेत. महापालिकेने (Municipality) पावसाळ्याच्या अगोदर दावा केला होता, की शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले. मात्र, पहिल्याच पावसात महापालिकेचे पितळ उघडे पडले. शहरातील नागरिकांनी खराब रस्त्यांमुळे महापालिकेविरोधात संताप व्यक्त केलायं. आता शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे महापालिका आयुक्तांनी देखील अधिकाऱ्यांना (officers) धारेवर धरले.
महापालिका आयुक्त पुलकुंडवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून महापालिका आयुक्त पुलकुंडवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कारण गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनावर नागरिक रोष व्यक्त करत आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीयं. आता यासर्व प्रकरणी स्वत: महापालिकेच्या आयुक्तांनी लक्ष घातल्याने ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे चित्र बघायला मिळते.
ठेकेदारांना तात्काळ ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचे आदेश
निकृष्ट रस्ते तयार करणाऱ्या ठेकेदारांना तात्काळ ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान शहरातील रस्त्यांच्या बांधकामांची गुणवत्ता तपासणाऱ्या गुणवत्ता विभागाचे अधिकारी नेमके करतात काय असा संतप्त सवाल यावेळी आयुक्तांनी उपस्थित केला. तसेच याप्रकरणी काही अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची देखील शक्यता वर्तवली जात असून ठेकेदारांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता आयुक्त काय कारवाई करतात हे बघण्यासारखे ठरणार आहे.