“त्या” नागरिकांच्या घरासमोर ढोल वाजवले, आणि मिळाले 73 लाख रुपये…
नाशिक महानगर पालिकेने कर वसूलीसाठी आखलेल्या मोहिमेला "लाखों" रुपयांचा फायदा.
Nashik News : कोरोना काळापासून नाशिक महानगर (NMC) पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यातच अनेक मालमत्ता धारकांनी कर न भरल्याने नाशिक मनपाच्या तिजोरीवरील भार वाढतच चालला आहे. त्यातच आता नाशिक महानगर पालिकेच्या कर विभागाने कर वसूलीसाठी (Tax) विशेष मोहीम हाती घेतली आहे. लाखाच्या वरील थकबाकीदार यांना नोटिसा बजावून कर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. जवळपास लाखाच्या वरील बाराशेहून अधिक थकबाकीदार होते. त्यानुसार नोटिसा देऊन करवसूली न केल्यास घरासमोर ढोल वाजवत कर वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी 73 लाखाच्या वर रक्कम मनपाच्या तिजोरीत आली आहे. यामध्ये नाशिक पूर्व 28 लाख रुपये, नाशिक पश्चिम 25 लाख 50 हजार रुपये, पंचवटी 3 लाख 48 हजार 727 रुपये, नाशिक रोड 5 लाख 89 हजार 129 रुपये, नवीन नाशिक- 5 लाख 20 हजार रुपये, सातपूर 5 लाख 50 हजार रुपये अशी वसुलीची वर्गवारी आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली आहे.
नाशिक शहरातील थकबाकीदारांच्या घरासमोर तसेच आस्थापनांसमोर ढोल बजाओ मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
कोरोना काळापासून अनेक नागरिकांनी कर भरलेला नव्हता, दोन ते तीन वर्षांपासून अनेकांनी घरपट्टी, पाणीपट्टी थकवलेली होती.
नाशिक महानगर पालिकेच्या कर विभागाने तिजोरीवरील वाढता भार बघता आयोजित केलेल्या या मोहिमेला नागरिक चांगलाच प्रतिसाद देत आहे.
मनपाचे कर्मचारी आणि अधिकारी हे थकबाकीदार नागरिकाच्या घराबाहेर जातात, संबंधित व्यक्तीला ढोल वाजवत कर भरण्याचे सांगतात.
जो पर्यन्त कर वसूली होत नाही तोपर्यंत ढोल बजाओ मोहीम सुरूच राहील अशी तंबी देखील अधिकारी देतात, याच वेळी मात्र नागरिक लागलीच कराची रक्कम देत आहे.