नाशिकः दिवसेंदिवस माणुसकी कमी होत चाललीय, हे आपण नेहमी ऐकतोच. मात्र, अतिसंवेदनशील अशा डॉक्टरी (Doctor) पेशामध्ये तर रुग्णांची भरमसाठ लूट सुरू असते, हे कोरोनाकाळात अनेकांनी अनुभवले. आता त्याच्याही पुढची एक घटना नाशिकमध्ये (Nashik) उघडकीस आली आहे. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस (Police) कर्मचाऱ्याला हृदविकाराचा झटका आला. त्याला नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर विविध बहाणे करून केवळ एका सहीसाठी हा मृतदेह पाच ते सहा तास अडवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलिसांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी स्वतः अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. मात्र, रुग्णालयाने विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांच्या सहीचा हट्ट धरला. शेवटी एका राजकीय कार्यकर्त्याने व्यवस्थापकाला धारेवर धरल्यानंतर पहाटे हा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र, या साऱ्या प्रकारामुळे चीड व्यक्त होत आहे.
नेमके प्रकरण काय?
जळगावचे पोलीस कर्मचारी श्रीराम रामदास वानखेडे (वय 53, रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव) हे रावेर येथे बंदोबस्तावर होते. यावेळी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने जळगावला नेले. तिथून नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी मध्यरात्री मृत्यू झाला. या रुग्णालयात मेडिक्लेमची सुविधा आहे. मात्र, वानखेडे यांना मृत घोषित करण्यापूर्वी हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांच्या जवळपास 35 कागदपत्रांवर सह्या घेतल्या. त्यानंतर मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, मृतदेह देण्यास नकार दिला.
खरे कारण काय?
खरे तर वानखेडे यांचे मेडिक्लेम होते. मात्र, ते मंजूर होण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या स्वाक्षरीची गरज हॉस्पिटल प्रशासनाला होती. त्याशिवाय कागदपत्रे पूर्ण होणार नव्हती. ही सही मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाने घेतली. आता मध्यरात्री विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांना कुठे गाठणार, हे नातेवाईकांनाही माहित नव्हते. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनीही हॉस्पिटलला सही नंतर मिळेल. मृतदेह द्यावा, अशी विनंती केली. मात्र, रुग्णालयाने त्यांनाही जुमानले नाही. शेवटी प्रहार संघटनेचे अनिल भडांगे यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला धारेवर धरले. त्यानंतर मृतदेह देण्यात आला. या भयंकर प्रकाराने पोलीस दलामध्ये प्रचंड असंतोष आहे.