गुवाहाटीला जाताना मला फोन आला, मी म्हणालो, येणार पण एका अटीवर…- बच्चू कडू
Bacchu Kadu on CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना बच्चू कडू यांनी कोणती अट ठेवली?; बच्चू कडू यांनी काय सांगितलं? 'दिव्यांगांच्या दारी' कार्यक्रमात बोलताना आमदार बच्चू कडू यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. वाचा सविस्तर...
नाशिक | 05 ऑगस्ट 2023 : मागच्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड केलं. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य नसल्याचं म्हणत शिंदे गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी हे सगळे आमदार आधी गुजरातमधील सूरतला गेले. तिथे काही दिवस राहिल्यानंतर हे आमदार गुवाहाटीला गेले. पुढे गोवा मार्गे मुंबईला येत सत्तास्थापन केली. यावेळी शिवसेनाच्या आमदारांसह काही अपक्ष आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. तेव्हा नेमकं काय झालं? गुवाहाटीला जाताना एकनाथ शिंदे यांनी काय शब्द दिला होता? यावर आमदार बच्चू कडू यांनी उघड भाष्य केलं आहे.
मला गुवाहाटीला जाण्यासाठी फोन आला. तेव्हा मी म्हणालो, दिव्यांग मंत्रालय आम्हाला पाहिजे. आता आनंद आहे की, दिव्यांग मंत्रालय आम्हाला मिळालं आहे. जगातले आणि देशातले पहिले दिव्यांग मंत्रालय आपल्या राज्यात आहे. आमच्या परभणी इथल्या कलेक्टरने एक दिवस दिव्यांग बांधवांसाठी ठेवला. दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र घरकुल योजना हवी. ज्या मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रालय दिलं, ते याला निधी कमी पडू देणार नाही, हा विश्वास आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
नाशिकमध्ये आज ‘दिव्यांगांच्या दारी’ उपक्रम राबवण्यात आला. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. दिव्यांग कल्याण विभागातर्फे ठक्कर डोम इथं हा उपक्रम राबवण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला दिव्यांग बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
जर अधिकाऱ्यांनी दोन पावले दमदार टाकले, तर दिव्यांग बांधव चार पावले टाकतील. आम्हाला हात, डोळे आहे. पण काही गोष्टी कमी असलेले माणसं जिद्दीने जगत असतात. तुमच्याकडे पाहिल्याने आमचं दुःख निघून जातं. आम्ही आमदार, खासदार एखादा कायदा तोडतो. दिव्यांग बांधवांच्या घरासाठी कायदा तुटला तरी हरकत नाही. याला मंत्रालयाचा दर्जा पाहिजे. तुमच्या आशीर्वादाने आम्ही हेही करू.
आम्ही गुवाहाटीला गेलो. बदनाम झालो. मी अडीच वर्ष राज्यमंत्री झालो. हा दिव्यांग मंत्रालयाचा प्रस्ताव घेऊन धावत होतो. आम्ही दिव्यांग मंत्रालय करा, अशी मागणी ठेवली होती. एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण आंदोलन केलं का? तुमचे आशीर्वाद असल्याने मी चार वेळा निवडून आलो. मत तर पैसे देऊन, दारू पाजून, मटण खाऊन पण मिळतं. पण आशीर्वाद महत्त्वाचे असतात, असंही बच्चू कडू म्हणाले.