Manoj Jarange Patil Sabha : मनोज जरांगे यांच्या टीकेला छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर; आक्रमक होत म्हणाले, माझा जीव जाणार असेल तर…
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil Sabha : तू जिवंत राहणार नाही, तुझी वाट लावू आणि शिव्या देत आहेत, पण...; धमकी प्रकरणावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेलाही छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी काही जुने दाखले दिले आहेत.
चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 14 ऑक्टोबर 2023 : जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनाज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेतून मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी यल्गार पुकारला. या सभेतील भाषणातून मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. याला आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी जुने काही दाखले दिलेत. ओबीसी आणि मराठा आरक्षणावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलंय. ते नाशकात माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीतील सभेतून छगन भुजबळ यांच्यावर थेट निशाणा साधला. मी अजितदादा पवार यांना आवाहन करतो की, छगन भुजबळांना जरा समज द्या. नाहीतर ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही. मग मी सोडत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. त्यांच्या या टीकेला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. राज्यात ओबीसी 54 टक्के पेक्षा जास्त आहेत. मराठा समाजाला वेगळं आणि टिकणारं आरक्षण द्या. मनोज जरांगे पाटील यांचं मी काय खाललं आहे हे त्यांनी सांगावं. आता मनोज जरांगे पाटील कुणाचं खातोय हे त्यांनी सांगावं, असं छगन भुजबळ म्हणालेत.
मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. एकदा नाही. तर अनेकवेळा धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. तू जिवंत राहणार नाही. तुझी वाट लावू अशी धमकी देते आहेत. शिव्याही दिल्या जात आहेत. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाहीत. पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याचं काय ते पुढे बघतील, असं म्हणत छगन भुजबळ यांनी धमकी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी समाज कार्यात आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठं केलं, असं सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला मोठं हे शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यासोबत मी काम केलं आहे. माझं देखील काहीतरी योगदान आहे. म्हणूनच मला संधी दिली गेली असेल. माझा माझ्या समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे, असं छगन भुजबळ म्हणालेत.
मी एका जातीचं प्रतिनिधित्व करत नाही. तर मी ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतो. ओबीसी समाजासाठी काम करतो. महादेव जानकर यांनी मला समर्थन दिलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. सध्या तरी ओबीसी बचाव हे एकच आमचं काम आहे, असंही भुजबळ म्हणालेत.