Independence Day 2023 : हेल्मेट न घालता गिरीश महाजन तिरंगा बाईक रॅलीत सहभागी; स्पष्टीकरण देताना म्हणाले…
Nashik Tiranga Bike Rally Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशकात तिरंगा बाईक रॅली; गिरीश महाजन यांचा विना हेल्मेट प्रवास; स्पष्टीकरण देताना काय म्हणाले? सध्याच्या राजकारणावर काय म्हणाले? वाचा सविस्तर...
नाशिक | 15 ऑगस्ट 2023 : आज देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. अशात ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ही बाईक रॅली पार पडली. मात्र या रॅलीत वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आलं. रॅलीत सहभागी झालेले मंत्री गिरीश महाजन तसेच कार्यकर्त्यांनी डोक्यावर हेल्मेट न घालताच दुचाकी चालवली. यावर मंत्री गिरीश महाजन यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती नाही. म्हणून मी हेल्मेट घातलं नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सगळेच लोकं विनाहेल्मेट आहेत. म्हणून मीही हेल्मेट घातलं नाही, असं गिरीश महाजन म्हणाले. आता मंत्रिमहोदयच वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. तर त्यांनतर महाजन यांनी नंतर दिलेल्या स्पष्टीकरणावर सगळेच अवाक झाले.
लक्ष्मण सावजींनी सांगितलं की, दहा मिनिटांची रॅली आहे. त्यांनी मला दीड तास रॅलीत फिरवलं. नेत्यांच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवावा, असं म्हणत गिरीश महाजन यांनी वातावरण हलकं केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं तर वाटेल हा कार्यक्रम भाजपचा आहे. आता कोण कोणत्या पक्षात आहे हे समजायलाच मार्ग नाही. मी नाशिक मध्ये सकाळपासून आलो आहे. एका ठिकाणी राष्ट्रवादीचा मोठा बॅनर, राष्ट्रवादीचा झेंडा. दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादीचे मोठे झेंडे. तिथे राष्ट्रवादीचा झेंडा. शिवसेनेचं पण तसंच आहे. अजून थोडं थांबा. चित्र स्पष्ट होईल, असं ते म्हणाले.
कोण अजित पवारांच्या गटात तर कुणी शरद पवारांच्या गटात. कुणी उद्धवजींच्या गटात तर कुणी शिंदेंच्या गटात. त्यामुळे लोकसंभ्रमात पडले आहेत. कोण कुणाच्या गटात आहे, हे कळायला मार्ग नाही. लोक विचारतात की तू सध्या कुठे आहे, असंही महाजन म्हणाले.
गरीब माणसाचे खाणे अगोदर ज्वारी भाकरी होतं. आता श्रीमंत देखील हेच खात आहेत. माझे एक मित्र जमिनीवर झोपतात. त्यांचं नाव सांगणार नाही. त्यांच्याकडं सर्व काही आहे. साखर कारखाने असून साखर खाता येत नाही. कड धान्याला जगाणे मान्यता दिली. शालेय पोषण आहारातही कडधान्ये द्यावीत, अशी मागणी आहे.कडधान्य संदर्भात आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. समजावून सांगितलं पाहिजे, असं म्हणत गिरीश महाजन यांनी चांगल्या आहाराचं महत्व पटवून दिलं.