पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेस सरकारची मान्यता; आरोग्य विद्यापीठ डिजीटल अभ्यासक्रम करणार सुरू
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर म्हणाल्या की, विद्यापीठ आवारात सुरू करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेस शासनाने मान्यता दिली असून, त्यामुळे संशोधनासाठी उत्तम व्यासपीठ मिळणार आहे. डिजीटल स्वरुपातील अभ्यासक्रम विद्यापीठाकडून लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. स्किल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी चालना मिळणार आहे.

नाशिकः महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेस सरकारने मान्यता दिली आहे. येणाऱ्या वर्षात आरोग्य विद्यापीठ डिजीटल अभ्यासक्रम करणार सुरू आहे. संशोधनासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याने विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात संशोधनावर भर दिला आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर यांनी दिली. नाशिक (Nashik) येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची (University) अधिसभा बैठक कुलगुरूंच्या (Vice Chancellor) अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण व अधिसभा सदस्य उपस्थित होते. डॉ. सचिन मुंबरे यांनी अधिसभेत अर्थसंकल्प सादर केला, तर लेखा अहवाल डॉ. मिलिंद देशपांडे यांनी मांडला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी या सभेचे संचलन केले. कुलगुरू म्हणाल्या, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संलग्नित महाविद्यालयांनी संशोधनाला चालना देण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम सुरू करणे शक्य आहे. विद्यापीठ आवारात सुरू करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेस शासनाने मान्यता दिली असून, त्यामुळे संशोधनासाठी उत्तम व्यासपीठ मिळणार आहे. डिजीटल स्वरुपातील अभ्यासक्रम विद्यापीठाकडून लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. स्किल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनासाठी चालना मिळणार आहे. गुणात्मक दर्जावाढीसाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात विविध उद्दिष्ट्ये आणि नवीन योजना कार्यान्वीत करण्यात येत आहेत.
विद्यार्थी केंद्री अर्थसंकल्प
कुलगुरू कानिटकर म्हणाल्या की, विद्यापीठाकडून ज्ञान संवर्धन करण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन, विविध विषयांवर व्याख्यानमाला, विद्यार्थ्यांकरिता कल्याणकारी योजना, संशोधन कार्यशाळा, विद्यार्थी अॅप, परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, विद्यापीठाचा भौगोलिक विस्तार आणि संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आदींवर प्रभावी काम करणे गरजेचे आहे. विद्यापीठाचा अर्थसंकल्पात विविध विकास कामे, संशोधन प्रकल्प, विद्यार्थ्यासाठी कल्याणकारी योजना, स्किल लॅब व विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. या संदर्भात अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे.
कशासाठी किती तरतूद?
कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले की, विद्यापीठाच्या 2022-2023 अर्थसंकल्प परिरक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प व योजना या तीन प्रकारात विभागला आहे. या अर्थसंकल्पात विद्यापीठाचे एकत्रित उत्पन्न 47080.83 लाख इतके अपेक्षित असून उत्पन्नाच्या तुलनेत एकत्रित खर्च रुपये 48010.76 लाख इतका अपेक्षित असल्याने वित्तीय तूट 929.93 लाख अपेक्षित आहे. संशोधन कार्यासाठी क्लिनिकल ट्रायल युनिटकरिता 200 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आयुष रिसर्च करिता 100 लाख, रिसर्च प्रोजेक्टकरिता 75 लाख, रिसर्च लॅबकरिता लाख, रिसर्च अॅक्टीव्हिटीकरिता 12.5 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. विद्यार्थी कल्याणासाठी कल्याणकारी योजननेत धन्वंतरी विद्याधन योजना, बहीःशाल शिक्षण, मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, कमवा व शिका योजना, विद्यार्थी अपघात विमा योजना व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास आदींसाठी 2280 लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांसाठी मदत निधी
कुलसचिव चव्हाण म्हणाले की, शिक्षक व विद्यार्थी मानसिक ताण-तणावापासून मुक्त राहावे यासाठी व्यक्तीमत्व विकास आदींच्या प्रभावी शिक्षण व उपक्रमासाठी 50 लाख रुपये, अवयवदान, कुपोषण, स्वच्छमुख अभियान संदर्भात सामाजिक जनजागृती करणे व विविध उपक्रमांसाठी 30 लाख रुपये, शिक्षकांना विविध वित्तीय कामकाजाचे प्रशिक्षण, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम यासाठी 110 लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कामानिमित्त संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास विद्यापीठाकडून मदत मिळावी यासाठी 25 लाख रुपये,ई-ग्रंथालयाकरीता 100 लाख रुपये इतकी तरतूद सन 2022-2023 अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
विभागीय केंद्र सक्षम करणार
विद्यापीठाचे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर येथील विभागीय केंद्रे सक्षम करण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून, संशोधन व विकास कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये ऐरोली येथील बांधकाम, नाशिक येथील विकास कामे, विभागीय केंद्र, नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर येथील जमीन खरेदी व बांधकामे आदींचा समावेश आहे. विद्यापीठ व विभागीय केंद्राच्या ठिकाणी अद्ययावत संशोधन प्रयोगशाळांची निर्मिती करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या आवारात आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रामार्फत कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार हे मोफत पुरविण्यात येतात. त्यासाठी या अर्थसंकल्पात औषधे, वैद्यकीय साहित्य खरेदी, आरोग्य शिबिरांसाठी 15 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे.
इतर बातम्याः