Video | नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या कार्यालयात व्यवस्थापकाची रोज पार्टी; दारू पिऊन तर्र, पाहाच…!
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराचे व्यवस्थापक असे दारूच्या नशेत तर्र आढळल्यानंतर शिवसैनिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी लक्ष्मण डामसे यांच्यावर तिथेच प्रश्नांच्या फैरी झाडल्या. मात्र, त्या प्रश्नांना उत्तर देण्याची शुद्धही त्यांच्यात नव्हती.
नाशिकः नाशिकमधील (Nashik) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या कार्यालयात चक्क अधिकारी दारू पिताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने स्टींग ऑपरेशन करून या प्रकरणाचा भांडाफोड केलाय. भांडार व्यवस्थापक (Manager) या कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून रोज दारू (Alcohol) पीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांचे कृत्य चव्हाट्यावर आणण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने व्हिडीओ तयार केला. आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होणार हे पाहावे लागेल. दरम्यान, जर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या विद्येच्या पवित्र कार्यालयात त्या विभागाचे प्रमुखच असे काम करत असतील, तर कर्मचाऱ्यांचे काय, असा सवाल विचारला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. त्याकडे कोणाचेही कसे काय लक्ष गेले नाही, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे.
नेमका प्रकार काय?
नाशिकमधील लेखानगर या भागात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराचे कार्यालय आहे. येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे पुस्तकांची निर्मिती येते होते. कार्यालयातील अनेक खोल्यांमध्ये पुस्तकाचे गठ्ठे आहेत. मात्र, या पुस्तकांच्या गठ्ठ्यांना लागणारे हात आधी दारूच्या ग्लासला लागल्याचे समोर येत आहे. या कार्यालयाचे व्यवस्थापक लक्ष्मण यशवंत डामसे हे रोज एका खोलीत दारू पित बसायचे. हा सारा प्रकार आता समोर आला आहे. शिवाय एका पलंगावर डामसे हे स्वतः दारू पित असल्याचे समोर आले आहे.
नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या कार्यालयात व्यवस्थापकाची रोजच रंगतेय पार्टी…! pic.twitter.com/ZnPoJvG3Rq
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2022
काय कारवाई होणार?
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराचे व्यवस्थापक असे दारूच्या नशेत तर्र आढळल्यानंतर शिवसैनिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी डामसे यांच्यावर तिथेच प्रश्नांच्या फैरी झाडल्या. मात्र, त्या प्रश्नांना उत्तर देण्याची शुद्धही त्यांच्यात नव्हती. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनीही शिवसैनिकांसमोर आपली कैफियत मांडली. शिवसैनिकांनी या साऱ्या घटनेचा व्हिडीओ तयार केला आहे. या प्रकरणी डामसे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावरून पाठ्यपुस्तक मंडळाचा भोंगळ आणि बेधुंद कारभार होतो कसा, याचे एक चित्रही महाराष्ट्रासमोर आले आहे. या प्रकाराबद्दल संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.