नाशिकः नाशिककरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. कुसुमाग्रजांच्या या नगरीतील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी (Marathi) भाषा भवन उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली आहे. शिक्षणाचा विस्तार सर्वत्र व्हावा, सर्वांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी सावित्रीबाई फुले पुणे (Pune) विद्यापीठांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यात उपकेंद्रांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यानुसार नाशिक येथील उपकेंद्राचे काम करण्यासाठी त्वरित निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील नियोजित कामास गती देण्यात यावी. हे काम गतीने पूर्ण होण्यासाठी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयाने कामाचा पाठपुरावा करावा, अश सूचनाही मंत्री सामंत यांनी दिल्या आहेत.
आढावा बैठकीचे आयोजन
सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र व शासकीय तंत्रनिकेतनबाबतच्या आयोजित आढावा बैठकीत मंत्री सामंत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल पवार, पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरण बोंदर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, नाशिक उपकेंद्राचे समन्वयक डॉ. किरणकुमार टोपे, अहमदनगर उपकेंद्राचे संचालक डॉ. एन. आर. सोमवंशी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे रजिष्टार बोंडे आदी उपस्थित होते.
अभिजात दर्जा मिळवण्याचे प्रयत्न
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन व मुक्त विद्यापीठाच्या समन्वयाने घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक दृष्ट्या देशातील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याकरिता राज्य शासनामार्फत आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
निधी उपलब्ध करून देणार
विद्यापीठांतर्गत असणारे महाविद्यालये व शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास महिला बचत गट, महिला मंडळ व स्वयंरोजगार संस्था यांना प्राधन्य देण्यात यावे. शासकीय तंत्रनिकेतनचा विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे प्रस्ताव सादर करावे. नाशिक जिल्ह्याला क्रीडा संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात क्रिकेट, फुटबॉल खेळांच्या सरावासाठी मैदानाची तरतूद करून तसा प्रस्ताव सादर केल्यास शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.
चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!
कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग