नाशिकमध्ये पेट्रोल पंपचालकांना नोटीस; हेल्मेटसक्तीचा आता कोर्टात लागणार निकाल
नाशिकमध्ये ऑगस्ट 2021 मध्ये नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी हेल्मेटसक्ती मोहीम सुरू केली. मात्र, पोलिसांनीच नियम धाब्यावर बसवून या मोहिमेकडे पाठ फिरवल्याचे समोर आले होते.
नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) पोलीस (Police) आयुक्त दीपक पांडेय यांनी अतिशय लावून धरलेल्या तरीही आतापर्यंत काहीही हाती न लागलेल्या हेल्मेटसक्ती प्रकरणाचा तिढा आता पुन्हा एकदा कोर्टात जाणारय. पोलीस आयुक्तांच्या आदेशानानुसार शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांनी पेट्रोल पंपचालकांना नो हेल्मेट, नो पेट्रोल (Petrol) असे धोरण राबवण्याच्या नोटीस दिल्यात. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, आपल्या पेट्रोल पंपावर विनाहेल्मेट दुचाकी चालकांना पेट्रोल दिल्याचे आढळले आहे. हेल्मेट घातलेल्या दुचाकी चालकाला पेट्रोल देण्यात यावे. अन्यथा या पुढे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 (ब) (1) नुसार कारवाई करू, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, यावरून पुन्हा एकदा पेट्रोल पंपचालक आणि पोलीस आयुक्त असा नवीनच संघर्ष शहरात पाहायला मिळणार आहे. पोलीस आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार पेट्रोल पंपचालकांनी केला आहे.
बैठकीत काय मंथन?
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पाठविलेल्या नोटीसनंतर पेट्रोल पंपचालकांची एक ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला. यापूर्वीही हे प्रकरण कोर्टात गेले होते. तेव्हा पोलीस आयुक्तांनी सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, पंपचालकांना नोटीस देताना पोलीस आयुक्तांनी सुनावणीही घेतली नाही. याबद्दलही पंपचालकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोहीम फसली तरीही…
नाशिकमध्ये ऑगस्ट 2021 मध्ये नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल मोहीम सुरू केली. मात्र, या नियमांचे पोलिसांनीच उल्लंघन केले. पुढे नागरिकांनीही विरोध केला. आता पुन्हा पोलीस आयुक्तांनी ही मोहीम कठोर राबण्याचा निर्णय घेतलाय.
‘त्या’ 111 जणांचा मृत्यू
– नाशिकमध्ये गेल्या वर्षी 2021 मध्ये 116 दुचाकी अपघात.
– या अपघातामध्ये तब्बल 124 जणांचा झाला मृत्यू.
– मृतातील 111 जणांनी हेल्मेट घातलेले नव्हते.
– ऑगस्ट महिन्यात 9 जणांचा मृत्यू.
– ऑगस्टपासून हेल्मेटसक्ती सुरू करण्यात आली.
– नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान विशेष अभियान राबवले गेले.