नाशिकमधील पालखेड डावा कालव्याच्या नूतनीकरणास 185 कोटी रुपये मंजूर; जागतिक बँकेच्या सिम्प कार्यक्रमात निवड
सिम्प या योजनेअंतर्गत एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत निधी पुरविण्यात येणार असून, पालखेड डावा कालवा व त्याच्या लाभ क्षेत्रातील सर्व वितरण व्यवस्था तसेच ग्राउंड वॉटर डेव्हलपमेंट इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी 185 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली असून, या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या फायनान्स डिपार्टमेंट ने सहमती दिलेली आहे.
नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पालखेड डावा कालव्याच्या नूतनीकरणास 185 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, जागतिक बँकेच्या सिम्प (SIMP) कार्यक्रमात राज्यातील दोन प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यात या कालव्याचा समावेश आहे. मंजूर निधीतून कालव्याच्या 0 ते 85 किलो मीटर लाभ क्षेत्रातील कालव्याचे अस्तारीकरण व विस्तारीकरण दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच ही कामे सुरू करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. भुजबळ फार्म येथे जलसंपदा विभागाकडील विविध प्रलंबित विषयासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी भुजबळांनी ही माहिती दिली. बैठकीला पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, जलसंपदा विभागाचे उपअभियंता चंद्रकांत टोपले, मिलिंद बागुल, व्ही. डी. बागुल, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर उपस्थित होते.
कोणत्या कामांचा आढावा?
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणले की, सिम्प (SIMP System Improvement Modernisation programme) या योजनेअंतर्गत एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत निधी पुरविण्यात येणार असून, पालखेड डावा कालवा व त्याच्या लाभ क्षेत्रातील सर्व वितरण व्यवस्था तसेच ग्राउंड वॉटर डेव्हलपमेंट इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी 185 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली असून, या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या फायनान्स डिपार्टमेंट ने सहमती दिलेली आहे. सदरची कामे सुरू करण्याआधी एशियन डेव्हलपमेंट बँकेचे कन्सल्टंट क्षेत्रावर येऊन पाहणी करून प्रोजेक्ट रिपोर्ट आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून काम करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या कार्याक्रमांतर्गत पालखेड डावा कालव्याची अस्तरीकरण, विस्तारीकरण तसेच एस्केप गेट बसविणे, कालव्यावरील पुल बांधणे,चारी दुरूस्त करणे, इत्यादी महत्वपूर्ण कामे करण्यात येणार आहे.
पाण्याचे नियोजन करा
भुजबळ म्हणाले की, शेतीसाठी लागणारे पाणी, पिण्यासाठी लागणारे पाणी तसेच इतर कारणासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पुल व रस्ता बांधणीसाठी मागणी केली आहे. त्याठिकाणी प्रत्यक्ष क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी भेट देवून गरजेनुसार योग्य तो निर्णय घ्यावा. नांदूरमधमेश्वर ते संवत्सर, खेडलेझुंगे, कानळद पूर रेषा निश्चित करणे तसेच रुई, देवगाव, खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद, वाकद शिरवाडे या परिसरात नाल्यांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची दरवर्षी होणारी नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना व कार्यवाही करणे, गोदावरी डावा तट कालवा साखळी क्रमांक 20500 ते 21300 मीटर मध्ये विशेष दुरुस्ती अंतर्गत कालव्यास अस्तरीकरणाच्या कामांसदर्भात अंदाजपत्रकास मान्यता मिळणे व गोदावरी डावा कालवा चारी क्रमांक 3 वरील पाणी मिळत नसल्याने झाडे झुडपे काढणे व पालखेड डावा कालवा चारी क्रमांक 25 दुरुस्त करून पाणी टेल ते मुखेड पर्यंत मिळणेबाबत कामांचा आढावा घेण्यात आला.
वणी बोगद्याचे विस्तारीकरण
चाऱ्यांवरील पाणी वापर संस्था लिक्विडेशनमध्ये निघाल्याने पाटबंधारे खात्याकडे 7 नंबर फार्म भरून पाणी मिळण्याबाबत तसेच मुखेड शिवारात चाऱ्यावर आवश्यक ठिकाणी रस्ता क्रॉसिंग करणे, पालखेड डावा कालवा 111 किलो मीटरमध्ये कालव्यावर सोनवणे वस्तीकडे जाण्यासाठी पूल बांधणे, ओझरखेड कालव्यातून खडक माळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 49 किलो मीटर मध्ये एस्केप (गेट) बसविणे व दिनांक 26 फेब्रुवारी 2020 अन्वये दिलेल्या पत्रानुसार पालखेड डावा कालव्यावर थेट विमोचक बसविणेबाबत तसेच पुणेगाव दरसवाडी कालवा किलो मीटर 1 ते 25 विस्तारीकरण आणि सदर कालव्यावरील वणी येथील बोगद्याच्या विस्तारीकरणाचे काम व पुणेगाव-दरसवाडी कालवा व दरसवाडी -डोंगरगाव पोहोच कालव्याचे अपूर्ण काम यांत्रिकी विभागाकडून पूर्ण करण्याच्या सूचना भुजबळांनी दिल्या. चांदवड तालुक्यातील दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा काजीसांगवी येथील भूसंपादन इत्यादी कामांचा आढावा घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. इतर बातम्याः