Nashik: अनेकांचे डोळे पाणावले, अत्यंत भावनिक क्षण, 5 अनाथ मुलं पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू
नाशिकच्या पोलीस अकादमीत झालेल्या 124 व्या दीक्षांत सोहळ्यात पाच अनाथ मुलांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले. हे मुले तर्पण फाउंडेशनशी जोडलेली आहेत. या यशाबद्दल भाजपा आमदार श्रीकांत भारतीय आणि त्यांचे कुटुंब अभिमान व्यक्त करत आहेत. सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचाही गौरव करण्यात आला. दरम्यान 5 अनाथ मुलांचे हे यश समाजासाठी प्रेरणादायी आहे.
नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर पार पडलेल्या 124 व्या दीक्षांत सोहळ्यात नव्याने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांनी आपल्या यशाने सोहळ्याला भावनिक रंग दिला. विशेष म्हणजे 2018 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अनाथ मुलांना शासकीय सेवांमध्ये एक टक्का आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर, या दीक्षांत सोहळ्यात पहिल्यांदाच पाच अनाथ मुलांनी प्रशिक्षण पूर्ण करत पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू होण्याचा मान मिळवला.
नाशिकच्या पोलीस अकादमीच्या मैदानावर 124 वा दीक्षांत सोहळा दिमाखात पार पडला. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत सेवेत रुजू होण्याचा मान मिळवला. या सोहळ्याचं मुख्य आणि भावनिक केंद्रबिंदू ठरलं ते म्हणजे तर्पण फाउंडेशनच्या 5 अनाथ मुलांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रशिक्षण पूर्ण करत आपले स्वप्न साकार केले. भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांच्या पुढाकाराने अनाथ मुलांसाठी झोकुन देऊन काम करणाऱ्या तर्पण फाउंडेशनच्या या पाचही अनाथ मुलांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू होण्याचा मान मिळवला.
भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय आणि त्यांच्या पत्नी यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह या क्षणाला साक्षीदार होण्यासाठी उपस्थिती लावली. “मी अनाथ असलो तरी तर्पण फाउंडेशनने मला आई-वडिलांचा आधार दिला. आज त्यांच्या उपस्थितीने माझ्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणाला अनमोल बनवले,” अशी भावना तर्पण फाउंडेशनचा सदस्य असलेल्या अभय तेलीने व्यक्त केली.
श्रीकांत भारतीय यांचे डोळे पाणावले
श्रीकांत भारतीय आणि त्यांच्या परिवाराचे डोळे या प्रसंगी आनंदाने पाणावले. या संस्थेने अनाथ मुलांना शिक्षण, प्रशिक्षण आणि आधार देऊन त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली आहे. या पाच मुलांनी त्यांच्या कष्टाने पोलीस दलात स्थान मिळवून समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवल्याची भावना श्रीकांत भारतीय आणि त्यांच्या पत्नीने व्यक्त केली.
या प्रशिक्षणात दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थींनी पासिंग आऊट परेड आणि मलखांबचे प्रात्यक्षिक देखील सादर करून उपस्थितांची मन जिंकली. हा सोहळा नाशिकसाठी आणि तर्पण फाउंडेशनसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.