Nashik Police Order : नाशिकमध्ये मशिदींवरील भोंग्यांचे डेसिबल मोजणे सुरू, मर्यादा वाढल्यास कारवाईचा इंगा…!
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्यावरून सामाजिक वातावरण ढवळून निघू नये म्हणून काही आदेश दिलेत. आयुक्तांच्या या आदेशाची जोरदार चर्चा आहे. राज्य सरकारही हाच पॅटर्न राबवायचा विचार करते आहे.
नाशिकः नाशिकमध्ये पोलीस (Police) आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्याविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. सय्यद पिंप्री गावात मंगळवारी सकाळी नाशिक ग्रामीणचे पोलीस पोहचले. त्यांनी गावातील मशिदमध्ये अजान सुरू असताना आवाजाचे डेसिबल मोजले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडव्यादिवशी मुंबई शिवतीर्थावर सभा घेतली. या सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात टीकास्त्र सोडले. तसेच रमजानपर्यंत हे भोंगे उतरवले नाही, तर मशिदीसमोर हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिलाय. शिवाय मनसे सैनिक आपल्या पद्धतीने हा विषय हाताळतील, असा निर्धारही त्यांनी केलाय. त्यामुळे नाशिकमधील पोलीस प्रशासन जागे झाले आहे. त्यांनी कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्यासाठी आता परवानगी सक्तीची केली आहे. शिवाय डेसिबलची मर्यादा पाळली नाही, तर कारवाईचा इशारा दिला आहे.
आज नेमके काय झाले?
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आज सकाळीच धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्यांचे डेसिबल मोजण्याचे आदेश दिले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त टीम आवाज मोजण्याचे काम करणार आहेत. त्यासाठी त्यांना डेसिबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. या आदेशानंतर आज नाशिक ग्रामीणचे पोलीस पथक थेट सय्यद पिंप्री गावात पोहचले. यावेळी गावातील मशिदीमध्ये नमाज पठण सुरू झाल्यानंतर येथील भोंग्याचे डेसिबल मोजण्यात आले. मात्र, ते किती भरले, हे सांगण्यात आले नाही. भोंगे वाजवण्यासाठी दिवसा 55 डेसिबल, तर रात्री 45 डेसिबल आवाजाची आहे मर्यादा आहे. या मर्यादेचे पालन केले नाही, तर कारवाई करू असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
आयुक्तांचे आदेश चर्चेत
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्यावरून सामाजिक वातावरण ढवळून निघू नये म्हणून काही आदेश दिलेत. त्यानुसार, कोणत्याही धार्मिक स्थळावर आणि इतर ठिकाणी भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला 3 मे पर्यंत अर्ज करता येईल. मात्र, अजानच्या आधी आणि नंतर 15 मिनिटे काहीही म्हणायला परवानगी दिली जाणार नाही. मशिदीच्या 100 मीटरच्या आत प्रवेश दिला जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. ध्वनीप्रदूषण पातळीच्या नियमाचे पालन करावे. अन्यथा कायदा मोडणाऱ्यांवर 4 महिने ते 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. त्यात दंड वेगळा असेल. तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तडीपारी होऊ शकते. 6 महिन्यांसाठी अटक होऊ शकते. आयुक्तांच्या या आदेशाची जोरदार चर्चा आहे. राज्य सरकारही हाच पॅटर्न राबवायचा विचार करते आहे.
इतर बातम्याः