नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) प्रभाग प्रीमियर लीग क्रिकेट (Cricket) स्पर्धेत डब्लूसीसी ‘ए’ संघाने जोरदार कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेत डब्लूसीसी ‘ए’ संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तर फ्रेंड्स संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. डब्लूसीसी ‘बी’ संघास तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक अंकुश परदेशी यास, तर सर्वोत्कृष्ट फलंदाजाचे परितोषिक अथर्व कासार यांना मिळाले. सिंग 11, नागेश्वरी, न्यू विश्वविनायक, मौनगिरी फ्रेंड्स सर्कल, पवनपुत्र, जेजेसीसी, विश्वविनायक, अष्टविनायक ए, अष्टविनायक बी या संघाने स्पर्धेत सहभाग नोंदविला. क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक संघाला सन्मानचिन्ह व खेळाडूंना सन्मानपत्र देण्यात आले.
दोन दिवस स्पर्धा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या पुढाकाराने प्रभाग प्रीमियर लीग स्पर्धा 19 व 20 मार्च या कालावधीत घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन मधुकर जेजुरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. हरिश्चंद्र आडके, प्रा. जुन्नरे, राजेंद्र भुजबळ, सुधाकर चव्हाण, मुन्ना वाघ, विनायक वाघ आदी उपस्थित होते. नाशिक शहरातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील कलागुणांना वाव मिळून देण्यासाठी व त्यांना योग्य संधी निर्माण करून देण्यासाठी शहरातील सर्व प्रभागात या टर्फ क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या.
प्रत्येक टीमला सन्नानचिन्ह
नाशिकमधील योग्य क्षमता असलेल्या खेळाडूंनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून नाशिकचे नावलौकिक वाढवावे, याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्याकरिता व स्पर्धांच्या माध्यमातून राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे असते. स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना योग्य परितोषिक दिल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावत असतो व यातून नवीन खेळाडू निर्माण होण्यास मदत मिळत असते, असे स्पर्धेचे आयोजक अंबादास खैरे म्हणाले. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक टीमला सन्मानचिन्ह व खेळाडूंना सन्मानपत्र देण्यात आले.