चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, नाशिक | 24 डिसेंबर 2023 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो संजय राऊत यांनी काही दिवसांआधी शेअर केला होता. हा फोटो चीनमधल्या मकाऊ शहरातील होता. यानंतर बावनकुळे मकाऊत कसिनो खेळत असल्याची चर्चा सर्वत्र रंगली. हा फोटो ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी संजय राऊत यांना दिल्याचं बोललं जात आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय. त्यांनी मोठा खुलासा केलाय.
आमची जी माहिती आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतील व्हीडिओ सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबियांनी दिला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असल्याचं बोललं जातंय. कुठलातरी व्हीडिओ कुणीतरी दिला. म्हणून बडगुजर यांच्यावर कारवाई होणं चूक आहे. आपला कायदा अशा पद्धतीने काम करतो? मुळात तो व्हीडिओ बडगुजर यांच्या कुटुंबाने दिलाच नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो. बाळासाहेब ठाकरे हे माझं दैवत आहे. त्यांची मी कधी शपथ घेत नाही. पण आज त्यांची शपथ घेऊन सांगतो. त्या व्हीडिओशी सुधाकर बडगुजर यांचा काहीही संबंध नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
भाजपच्या लोकांनी आपआपसात विचारलं पाहिजे बावनकुळे यांचा हा व्हीडिओ कुणी दिला ते… त्यांना चांगलंच माहिती आहे की बावनकुळे यांचा व्हीडिओ नेमका कुणी दिला. हा व्हीडिओ आमच्यापर्यंत कसा आला हे भाजप आणि संघ परिवाराला माहिती आहे. विशेषत: नागपूरच्या लोकांना माहिती आहे की, हा व्हीडिओ आम्हाला कुणी दिला ते… विनाकारण बडगुजर कुटुंबावर आरोप करू नका, असं संजय राऊत म्हणालेत.
23 जानेवारी रोजी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा राहणार आहेत. या मेळाव्यासाठी जागानिश्चिती आणि पूर्वतयारीसाठी ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आज नाशकात आहेत. खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत आज नाशिकमध्ये येणार आहेत. दरम्यान खासदार संजय राऊत हे काल रात्रीच नाशिकमध्ये दाखल झालेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे गटाला ऊर्जा मिळण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचं ठरणार आहे.