नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात ईव्हीएमशिवाय निवडणुका घेऊन दाखवा मग…; संजय राऊतांचं ओपन चॅलेंज
Sanjay Raut on Narendra Modi Constituency Varanasi : उदय सामंत हा एक बोगस माणूस, बोगस माणसाला सर्वच बोगस दिसतो. मग याच्या काळात देखील ते महत्त्वाच्या खात्याचे मंत्री होते. तेव्हा बिनकाचेचा गॉगल लावून बसले होते का?, असा थेट सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. वाचा...
चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी- नाशिक | 21 जानेवारी 2024 : ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी चॅलेंज दिलं आहे. मोदींच्या मतदारसंघात ईव्हीएमशिवाय निवडणुका घेऊन दाखवा, असं संजय राऊत म्हणालेत. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला सर्वांचाच विरोध आहे. ईव्हीएम आणि वन नेशन वन इलेक्शन सर्व फ्रॉड आहे. भाजपने सत्तेवर राहण्यासाठी टाकलेलं जाळं आहे. देशातून जेव्हा ईव्हीएम जाईल त्यादिवशी भाजप ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा जिंकू शकणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलंय. संजय राऊत नाशिकमध्ये बोलत होते.
राऊतांचं चॅलेंज
भाजपला स्वतःच्या क्षमतेवर एवढा आत्मविश्वास असेल. तर त्यांनी कोणत्यातरी एका निवडणुकीपुरतं ईव्हीएम दूर करावं. वाराणसीतल्या निवडणुका तरी त्यांनी ईव्हीएम शिवाय घेऊन दाखवाव्यात. मग त्यांना कळेल मी काय म्हणतोय. ईव्हीएम हटी भाजपा गई…, हा नारा आहे. लोकशाहीच्या दृष्टीने ईव्हीएम ही दुर्घटना आहे. वन नेशन वन इलेक्शन हा फ्रॉड देशाची लोकशाही संपवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.
ठाकरे उद्या नाशकात
उद्या उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येणार आहेत. नाशिकमध्ये काळाराम मंदिरात त्यांच्या हस्ते महापूजा केली जाणार आहे. याबाबतही संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. आज आम्ही संपूर्ण आढावा घेणार आहोत. शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील. उद्धव ठाकरे ओझर इथं आगमन झाल्यानंतर भगुरला जातील. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला अभिवादन करतील आणि लोकांना संबोधित करतील. त्यानंतर काळाराम मंदिरात दर्शन घेतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
“हा आमच्या आस्थेचा विषय”
उद्याचा सोहळा हा देशाच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. राजकारणात न पडता, आम्ही जिथे असू, तिथे रामाला अभिवादन करू. म्हणून आम्ही काळाराम मंदिरात जाऊ आणि गोदा आरती करू. शरयू इथं आरतीचा भव्य असा सोहळा आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही उद्याचे सर्व सोहळे श्रद्धापूर्वक करू. आम्ही सगळ्यांना या सोहळ्याचे आमंत्रण दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील आम्ही निमंत्रण दिलं आहे. सोमनाथ मंदिराच्या सोहळ्याच्या वेळी राष्ट्रपती उपस्थित होते. त्यामुळे अयोध्या येथे राष्ट्रपती उपस्थित राहणे अपेक्षित होतं, असंही राऊत म्हणालेत.
23 जानेवारी रोजी सकाळी दहा 1500 ते 1600 प्रमुख लोकांच्या उपस्थितीत अधिवेशन होईल. निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आणि काही ठराव होतील. साडे पाच वाजता खुले अधिवेशन म्हणजेच जाहीर सभा होईल. त्यात सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळे होतील. त्याची तयारी सर्व व्यवस्थित सुरू आहे, असंही राऊतांनी सांगितलं आहे.