मनसेला राम-राम करणाऱ्या वसंत मोरे यांना संजय राऊतांचा सल्ला; म्हणाले…
Sanjay Raut on Vasant More Resignation MNS : राज ठाकरेंच्या शिलेदाराने पक्ष सोडला; संजय राऊत यांचं स्पष्ट भाष्य, म्हणाले... वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला रामाराम केला. त्यानंतर आता यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. वाचा सविस्तर...
चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 12 मार्च 2024 : वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. काही वेळा आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहित त्यांनी आपली राजीनामा सुपूर्द केला आहे. मनसेतील या मोठ्या घडामोडीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. वसंत मोरेंनी मनसेला रामराम केला, यावर मी काय बोलू… त्यांनी पुढील दिशा ठरवली पाहिजे. लोकसभा लढवायची असेल तर कोणत्या पक्षाकडून हे त्यांनी ठरवलं पाहिजे. वसंत मोरे यांनी फक्त भाजपच्या वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये. शरद पवारांकडून मोरेंनी मार्गदर्शन घेतलं असेल तर चुकीचे काय? शरद पवार देशाचे नेते आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर
आज सकाळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांवर टीका केली होती. त्याला राऊतांनी उत्तर दिलं आहे. मी कधीच खोट बोलत नाही. संजय राऊत सत्य बोलतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. या देशातील हुकूमशहाचा पराभव करण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर बरोबर पाहिजे. मविआकडून 4 जागांचा प्रकाश आंबेडकरांना प्रस्ताव देण्यात आला आहे. आता त्यांची भूमिका काय आहे? हे माहीत नाही. मात्र ते आमच्या सोबत राहिले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. प्रकाश आंबेडकर खोट बोलतात अस मी कधीच म्हणणार नाही. ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत, असं राऊत म्हणाले.
मविआचं जागावाटप कधी?
महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही संजय राऊतांनी भाष्य केलं. आमच्या जागावाटपात तेढ नाही. फक्त वंचितला दिलेल्या प्रस्तावाची आम्ही वाट बघतो आहोत. प्रकाश आंबेडकर गेल्या वर्ष भरापासून आमच्याशी चर्चा करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. मी त्यासाठीच नाशिकमध्ये आलो आहे. महाराष्ट्र आणि मविआला या यात्रेचा फायदा होईल. राज्यात परिवर्तनाला सुरुवात होईल, असं संजय राऊत म्हणाले.