नाशिकः नाशिक (Nashik) येथील दाजीबा वीर व रंगपंचमी उत्सव साजरा केला म्हणून विविध मित्र मंडळांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी भाजप आमदार आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांची भेट घेऊन केलीय. गृहमंत्र्यांनीही हे गुन्हे लवकरच मागे घेऊ, असे आश्वासन दिल्याचे समजते.नाशिक येथे होळीच्या दुसर्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. नागरिकांमध्ये देव देवतांचे तसेच वीरांचे स्मरण व्हावे यासाठी सुमारे 1500 ते 2000 वीर देव देवतांचे सोंग घेऊन वाजत-गाजत पाच पावली करत गोदावरी नदीत आपल्या देवदेवतांना घालतात. ही नाशिक येथील जुनी परंपरा आहे. गेल्यावर्षीही हा उत्सव साजरा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यावर्षीही तेच झाले. रंगपंचमी उत्सव साजरा करणाऱ्यांवरही गुन्हे नोंदवण्यात आले. मात्र, हे दोन्ही गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिकमध्ये वीर नाचवण्याची ही परंपरा अति प्राचीन आहे. दाजीबा महाराजांचा वीर हे यातील प्रमुख आरक्षण असते. या वीराच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र, मागील वर्षी व या वर्षी देखील दाजीबा महाराजांच्या वीराचा मान असणाऱ्या विनोद बेलगावकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंदवण्यात आले. तसेच नाशिक येथे रंगपंचमी जोरात साजरी करण्यात आली म्हणून महत्त्वाच्या मित्र मंडळांवर देखील गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
परंपरा मोडण्याचा प्रयत्न
आमदार देवयानी फरांदे यांनी या नोंदवलेल्या गुन्ह्यांची दखल घेऊन अशा प्रकाराने हिंदू सण साजरे होत असताना त्यांच्यावर गुन्हे नोंदवणे हे गैर असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. नाशिक तीर्थक्षेत्राचे शहर असल्यामुळे नाशिक शहराच्या स्वतःच्या अनेक प्रथा व परंपरा आहेत. त्या प्रकार व परंपरांचा नाशिकच्या जनतेला सार्थ अभिमान आहे. यातीलच महत्त्वाची प्रथा रहाडीच्या रंगपंचमीची आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करून नाशिकच्या प्रथा-परंपरा मोडण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
गुन्हे तात्काळ मागे घ्या
दाजीबा वीर व रंगपंचमी उत्सव साजरा केला म्हणून प्रशासनाने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे. अधिवेशन झाल्यानंतर आपण पोलीस आयुक्तांशी चर्चा करून दाजीबा वीर व रंगपंचमीचा उत्सव साजरा केला म्हणून मित्र मंडळावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश देऊ, असे आश्वासन दिलीप वळसे – पाटील यांनी आमदार फरांदे यांना दिले आहेत.