Nashik: नाशिक येथील सोमेश्वर धबधब्यावर दोघे बुडाले, धबधब्याच्या पाण्यात पोहणं जीवावर बेतलं!
Nashik Waterfall drown: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर दोघे तरुण बुडाले आहे. दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
नाशिक : नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर दोघे तरुण बुडाले आहे.मंगळवारी (19 एप्रिल) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. चार मित्रांपैकी दोघेजण बुडाले आहेत. दरम्यान, याबाबतची माहिती कळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांना जीव गमवावा लागलाय. मित्रांच्या डोळ्यांदेखत दोन तरुण बुडाले आहेत. धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी हे आपल्या चार मित्रांसोबत नाशिकच्या सोमेश्वर धबदभ्यावर फिरण्यासाठी आले होते. यावेळी धबधब्याच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत झालाय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही मृत मुलांचे कुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले. तरुण मुलांच्या मृत्यूबाबत कळताच दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
चौघेही जण पोहण्यासाठी उतरले…
सोमेश्वर धबधब्यावर फिरायला आलेले चौघी मित्र पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. वाढत्या तापमानामुळे पाण्यात उतरून आनंद घेण्याचा या मित्रांचा प्लान होता. मात्र पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा अंदाज धर्मेंद्र आणि आकाश यांना आला नाही.
इतर दोन मित्रांच्या डोळ्यांदेखत धर्मेंद्र आणि आकाश हे दोघेही पाण्यात बुडायला लागले. बुडत असलेल्या एका मित्राला वाचवण्यासाठी दुसरा मित्र धावला. मात्र दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसोबत अग्निशमन दलाच्या जवानांनी सोमेश्वर धरणाजवळ धाव घेतली. यानंतर बुडून मृत्यू झालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
कुटुंबीयांचा आक्रोश
फिरायला म्हणून गेलेल्या तरुण मित्रांनाही या घटनेनं मोठा धक्का बसला आहे. तर धबधब्याच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर या तरुण मुलांच्या कुटुंबीयांनाही कळवण्यात आलं. कुटुंबीयांना याबाबत कळल्यानंतर दोन्हीही मृत मुलांच्या कुटुबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता. दोन्हीही मृत मुलांचे नातलग घटनास्थळी दाखलही झाले होते. त्यानंतर या मुलांचे मृतदेह कुटुंबीयांच्या हवाले करण्यात आले.
काळजी घ्या…
राज्यात तापमान वाढलेलं आहे. अशात अनेकजण नदीच्या पाण्यात, विहिरीत किंवा पाण्याच्या प्रवाहा उतरून पोहण्याचा, अंघोळ करण्याच्या बेतानं पाण्यात उतरत आहेत. घामाघूम झालेल्यांना दिलासा म्हणून पाण्यात उतरणं धोकादायक ठरु शकतं, हे नाशिकमधील घटनेनं अधोरेखित झालंय. दरम्यान, पोहण्यास येत नसेल, तर अशाप्रकारं पाण्यात उतरणं जीवावर बेतू शकतं. त्यामुळे काळजी घेण्याचंही आवाहन केलं जातंय.
इतर बातम्या :
Summer Crop: मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीने घेरले, उत्पादनात घट अन् चाऱ्याचाही प्रश्न
नाशिकमध्ये कोरोना बळींचे गौडबंगाल, मृत्यू 4105, पण सानुग्रह अनुदानासाठी 8338 अर्ज मंजूर