चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नाशिक | 30 नोव्हेंबर 2023 : ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच आज छगन भुजबळ नाशिकच्या येवल्यात आहेत. पण मात्र इथं भुजबळांना मराठा समाजाने कडाडून विरोध केला आहे. मराठा समाजाच्या विरोधाला छगन भुजबळ यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. जिथं विरोध केला जातोय. तिथे मी जाणार नाही, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. येवला -लासलगाव मतदारसंघ भागतील गारपीट आणि अवकाळी नुकसानीचा पाहणी करणार आहेत. भुजबळांच्या येवल्यातील संपर्क कार्यालयाला छावणीचे स्वरूप आलं आहे. मराठा समाजाने दौऱ्याला विरोध केला आहे. भुजबळांच्या कार्यालयाबाहेर आहे.
सकल मराठा समाजाकडून मंत्री छगन भुजबळ यांना विरोध केला जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवले जाणार आहेत. मंत्री छगन भुजबळ आज येवला आणि निफाड तालुक्यातील अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. विंचूर चौफुलीवर सकल मराठा समाजाची रस्त्यावर बसून घोषणाबाजी करण्यात येत आहे. सकल मराठा समाजाला भेटण्यासाठी ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे दाखल झाले आहेत.
काही दिवसांआधी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचं नुकसान झालं. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ आज नाशिकमध्ये आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केलाय. मराठा समाजाचा विरोध लक्षात घेता छगन भुजबळ यांनी पाहणी दौऱ्याचा मार्ग बदललेला आहे.
मराठा समाजाच्या वतीने छगन भुजबळ यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. हा विरोध करत असतानाच छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.सातबारा आमच्या नावावर आहे. त्यामुळे आमच्या शेतात तुम्ही येऊ नका, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसंच एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा या आंदोलकांनी दिल्या.