नाशिकची लाइफलाइन गोदावरी एक्स्प्रेस 2 वर्षांनंतर सुरू; लासलगावमध्ये झोकात स्वागत
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे तीन महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर गोदावरी एक्स्प्रेस मनमाड येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत सुरू करण्यात आली आहे. त्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मनमाड, लासलगाव (Lasalgaon), निफाड व नाशिक येथील चाकरमानी व प्रवाशांची लाइफलाइन म्हणून ओळख असलेली मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस रेल्वे (Railway) दोन वर्षांच्या कालखंडानंतर अखेर आजपासून सुरू झाली. लासलगाव रेल्वे स्थानकात गोदावरी एक्स्प्रेस येताच तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. लासलगाव येथे गोदावरी एक्स्प्रेस येताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य डिके जगताप यांनी सत्कार केला. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे मनमाड- कुर्ला टर्मिनस गोदावरी गोदावरी एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती. ती पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, गोदावरी एक्स्प्रेस तोट्यात असल्याचे कारण ती सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाकडून सतत नकार घंटा देण्यात येत होती.
प्रायोगिक तत्त्वावर सुरू…
गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रवासी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय, तर प्रवाशांसह चाकरमान्यांचे होत असलेले हाल याची दखल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घेतली. त्यांनी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर गोदावरी एक्स्प्रेस मनमाड येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत सुरू करण्यात आली आहे. त्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मनमाड येथून नाशिकपर्यंत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्यासह भाजप कार्यकत्यांनी प्रवासही केला.
नाशिक-कल्याण कधी?
नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होणार म्हणून चर्चेत असणारी नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवा कधी सुरू होणार, अशी विचारणा आता नागरिकांमधून होत आहे. या रेल्वे सेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस सरत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांनाचा मोठा फायदा होणार आहे. आता महापालिका निवडणुकीपूर्वी तरी ही लोकल सुरू होते का, याची साऱ्यांना उत्सुकता आहे. इतर बातम्याः