छगन भुजबळ यांच्या बॅनरवरुन शरद पवार ‘गायब’, येवल्यात जोरदार शक्तीप्रदर्शन
छगन भुजबळ यांचं आज येवल्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह भाजपच्या देखील कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी एक अनोखी गोष्ट बघायला मिळाली.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते छगन भुजबळ यांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांची येवल्यात जाहीर सभा देखील झाली. या सभेत शरद पवार यांच्या समर्थकांकडून चांगलंच शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. तसेच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नाशिकमध्ये भुजबळ समर्थक आणि शरद पवार यांच्यात संघर्ष बघायला मिळाला होता. या सगळ्या घडामोडींनंतर आज छगन भुजबळ यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.
छगन भुजबळ मंत्री झाल्यानंतर आज त्यांचं येवल्यात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी बघायला मिळाली. विशेष म्हणजे आज राज्य सरकारकडून नव्या मंत्र्यांसाठी खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात छगन भुजबळ यांना अन्नृ-नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलं आहे. त्यानंतर आज नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या समर्थकांकडून जोरदार जल्लोष साजरा करण्यात येतोय.
छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण करुन त्यांचं स्वागत केलं आहे. मंत्री झाल्यानंतर भुजबळ आपल्या मतदारसंघात पहिल्यांदाच आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशा वाजत, गुलाल-उधळत, नृत्य करत स्वागत करण्यात आलं.
छगन भुजबळ यांच्या बॅनरवरुन शरद पवार गायब
छगन भुजबळ यांच्या स्वागतादरम्यान एक अनोखी गोष्टी बघायला मिळाली. छगन भुजबळ यांच्या बॅनरवरुन शरद पवार यांचा फोटो गायब असल्याचं बघायला मिळालं. या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा फोटो झळकतोय. तर शरद पवार यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे आता यावर भुजबळ आजच्या सभेत काही प्रतिक्रिया देतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर आपला फोटो कोणी वापरावा याबाबत मत मांडलं होतं. त्यांनी अजित पवार यांच्या गटाला आपला फोटो वापरण्यास प्रतिबंध घातला होता. अजित पवार गटाने आपला फोटो वापरु नये, असं शरद पवार स्पष्ट म्हणाले होते. त्यानंतर आता नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या स्वागताच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो गायब झालेला बघायला मिळतोय.