अजित पवार यांना पाठिंब्याची सही करणाऱ्या महिला आमदाराचा मोठा गौप्यस्फोट, त्यादिवशी नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 05, 2023 | 6:02 PM

अजित पवार यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात उपस्थितत राहिलेल्या नाशिकच्या देवळालीच्या महिला आमदार सरोज अहिरे यांनी त्या दिवशी घडलेला घटनाक्रम सांगितला. आम्ही आमच्या ज्येष्ठ नेत्यांवर आंधळा विश्वास ठेवतो, असं मोठं वक्तव्य सरोज अहिरे यांनी यावेळी केलं.

अजित पवार यांना पाठिंब्याची सही करणाऱ्या महिला आमदाराचा मोठा गौप्यस्फोट, त्यादिवशी नेमकं काय घडलं?
Follow us on

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली. सरोज अहिरे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या पाठिंब्याचा पत्रकावर सह्या करणाऱ्या आमदारांमध्ये सरोज अहिरे यांचाही समावेश आहे. अजित पवार यांच्या शपथविधीच्यावेली सरोज अहिरे या देखील राजभवनात दाखल होत्या. पण त्या कालपासून अचानक नॉट रिचेबल होत्या. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता सरोज अहिरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

“दोन्ही गटांमध्ये मी स्वत: भेटून आली आहे. मी अजित पवार आणि शरद पवार दोघांना भेटून आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या बोलणं झालं. शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी फोनवर बोलणं झालं. माझ्यासाठी शरद पवार आणि अजित पवार हे एकच नाणं आहे. आम्ही पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा परिवार आहे. मी आमच्या परिवारासोबत आहे. आज दोन मेळावे वेगळे झाले आहेत. सर्व लोकांशी चर्चा केल्यानंतरच मी माझ्या मतदारसंघाच्यावतीने भूमिका स्पष्ट करेन”, असं सरोज अहिरे यांनी सांगितलं.

“शरद पवार यांना मी वडिलांसारखं मानते. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना मानत राहीन. माझ्यासाठी ते आदरणीय आहेत. तर अजित दादा हे माझ्या मतदारसंघात मला उभं करण्यासाठी, मला तिकीट देण्यापासून माझ्या मतदारसंघात निधी देण्यापर्यंत अनेक प्रकारची मदत त्यांनी केलेली. त्यामुळे त्यांच्याही उपकाराची जाणीव माझ्या मनात आहे”, असं अहिरे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

सरोज यांची वरिष्ठांना विनंती

“माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे की, सर्वांनी विचार विनमय करुन एकत्र येऊन तोडगा काढावा. आमच्यासारख्या नवीन आमदारांचं प्रचंड मरण आहे. माझी मानसिक अवस्था खराब आहे. मला रुग्णालयात दाखल करावं लागलं. कारण अजित पवार आणि शरद पवार यांना निवडणं खूप कठीण आहे”, अशी भावना सरोज अहिरे यांनी व्यक्त केली. “माझ्या हाताला प्रचंड त्रास होतोय. सर्जरी करायची आहे”, असं सरोज अहिरे यांनी सांगितलं.

अजित पवार यांच्या पाठिंबा म्हणून सही का केली?

“मला अजित पवार यांनी जेव्हा बोलावलं, म्हणजे माझं एक काम होतं, मी माझ्या मतदारसंघातील प्रश्नासाठी कामानिमित्त गेले होते. तिथे सगळेच आमदार सह्या करत होते. त्यामुळे मी पण सही केली आहे. त्यानंतर आदेश आला की, राजभवनात जायचं आहे. मी तिथेही शपथविधीला होते. त्यानंतर मी सुप्रिया सुळे यांना भेटले. त्यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे. त्यानंतर शरद पवार पुण्याला होते. मग साताऱ्याला गेले. ते रात्री उशिरा आले म्हणून काल सकाळी मी त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा झाली”, असं सरोज यांनी स्पष्ट केलं.

‘आमच्या पक्षाच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास’

“आमच्या पक्षाच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास आहे. त्यामुळे मी सही केली, हे मी मान्य करते. मी एकटी आमदार नव्हते. अनेक आमदारांनी केल्या. मी सही केल्यानंतर राजभवानाकडे चला, असं सांगितलं तेव्हा थोडसा मलाही प्रश्न पडला होता. त्यानंतर मी अजित पवार यांच्याशी बोलले. अजित पवार यांच्याशी दोन ते तीन वेळा बोलणं झालं की, असं का म्हणून? त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्या मनात जे काही दु:ख आणि संभ्रम होतं त्याबद्दल शरद पवार यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. कुठेतरी शेवटी मी जनतेच्या मतावर आमदार आहे. मतदारसंघाचा कौल घेईन आणि मग निर्णय सांगेन”, असं सरोज यांनी सांगितलं.

“मला विश्वासघात म्हणता येईल. अजित दादांनी काही गोष्टी समजवून सांगितल्या आहेत. त्यानंतर मी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलेन आणि निर्णय घेईन. सगळे आमदार मतदारसंघात जाऊन तिथे आले आहेत. माझी कोणाशीही चर्चा झालेली नाही. मी खूप भावनिक आहे. मी काही निगरगट्ट राजकारणी नाही. मी सर्वसामान्य कुटुंबातून आली आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चॉईस करायचं झालं तर कठीण आहे”, असं सरोज म्हणाल्या.