मालेगावः नाशिकमध्ये (Nashik) पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी राबवलेल्या आणि प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या हेल्मेट सक्तीनंतर आता तशीच मोहीम मालेगावमध्ये सुरू होतेय. त्यामुळे सोमवारपासून मालेगावमधल्या (Malegaon) शासकीय कार्यालयामध्ये दुचाकीस्वारांना विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय आगामी काळात मालेगाव शहरातही दुचाकी चालकांना हेल्मेटसक्ती करण्यात येणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. नाशिकमध्ये ऑगस्ट 2021 मध्ये नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी तत्कालीन पोलीस (Police) आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल मोहीम सुरू केली. त्यानंतर दुचाकीस्वारांचे समुपदेशन, नाशिक शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये विनाहेल्मेट प्रवेश दिला नाही. त्यानंतर पेट्रोलपंप चालकांना विनाहेल्मेट दुचाकीधारांना पेट्रोल न देण्याचा सूचना दिल्या. अगदी दीपक पांडेय यांची बदली होईपर्यंत याप्रकरणी पेट्रोलपंप चालकांना नोटीस देण्यात आली. मात्र, नाशिकमध्ये या मोहिमेचा फज्जा उडालेला दिसला.
नाशिकनंतर आता मालेगावमध्ये सुरू होणाऱ्या हेल्मेटसक्तीला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहावे लागेल. वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे असून रिक्षा, कार तसेच अन्य सर्व वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांना नकीच आळा बसेल. त्यामुळेच येत्या सोमवारपासून शासकीय कार्यालयामध्ये विनाहेल्मेट प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच दुचाकीवरून येणाऱ्यांना विनाहेम्लेट येऊ नये. अन्यथा त्यांना दंड भरावा लागेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. मालेगावातील अपर जिल्हाधिकारी कार्यालय, मालेगाव कोर्ट, प्रांत, तहसीलदार कार्यालयासह सर्वच कार्यालयात येणाऱ्या नागरिक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही मालेगाव परिवहन विभागाने सूचना दिल्या असून, सोमवारपासून विनाहेल्मेट कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई करायचा इशारा दिला आहे. या अभियानाची पूर्व तयारी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी शहरातील शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रबोधनात्मक फलकही लावले आहेत.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!