कांद्याचे भाव कोसळले, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, लासलगावमध्ये आज लिलाव बंद!
सध्या लासलगावमध्ये कांद्याचे भाव इतक्या कमीवर आले आहेत. मग इतर बाजार समित्यांचे विचारूच नका. आता कांदा यायला सुरुवात झालीय. ही आवक वाढल्यानंतर पु्न्हा कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर रोजीरोटीचा मोठा प्रश्न आहे.
नाशिकः आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ख्याती असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव (Lasalgaon) बाजार समितीत कांद्याचे (Onion) भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत उन्हाळी कांद्यासोबत लाल कांद्याची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम भावावर झाला असून, सोमवारी गेल्या आठवड्यापेक्षा चारशे ते पाचशे रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळाली. लासलगाव बाजार समितीमध्ये सोमवारी लाल कांदा 600 ते 900 रुपये क्विंटल विकला गेला. तर उन्हाळी कांद्याला 900 ते 1200 रुपयांचा दर मिळाला. अवकाळी पावसामुळे भिजलेल्या कांद्याला क्विंटलमागे फक्त 200 ते 400 रुपयांचा भाव मिळाला. सध्या नाशिक जिल्ह्यात कांद्याची भरमसाठ आवक होत आहे. आगामी काळात त्यात वाढ होण्याची शक्यता असून, यंदा ग्राहकांना नव्हे, तर शेतकऱ्यांना जोरदार फटका देईल, अशी चिन्हे आहेत. रब्बी आणि खरिपामध्ये अतिवृष्टीचा दणका. त्यात अवकाळी संकट आणि आता भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
कुठे आला कांदा?
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा, विंचूर, कळवण, बागलाण, दिंडोरी, वणी, नामपूर, मनमाड, नांदगाव, येवला या बाजार समित्यामध्ये सध्या कांद्याची तुफान आवक सुरूय. शनिवार आणि रविवारी बाजार समिती बंद होती. त्यात आज मंगळवारी रंगपंचमीमुळे बाजार समितीला सुट्टी आहे. हे पाहता काल आवक अजून वाढली. त्याचाही भावावर परिणाम झाल्याचे समजते. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातही कांद्याची आवक अचानक वाढली. त्यामुळे बाजार समितीत कांदा ठेवायला जागा शिल्लक नव्हती.
कोंडी कधी आणि कशी फुटणार?
सध्या लासलगावमध्ये कांद्याचे भाव इतक्या कमीवर आले आहेत. मग इतर बाजार समित्यांचे विचारूच नका. आता कांदा यायला सुरुवात झालीय. ही आवक वाढल्यानंतर पु्न्हा कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्नय. एक तर हवामान साथ देत नाही. त्यात कधी अतिवृष्टी, तर कधी अवकाळी पावसाने पीक मातीमोल होते. जेव्हा पीक येते, तेव्हा भाव नसतो. त्यामुळे जगायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ही कोंडी कधी आणि कशी फुटणार असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
असे आहेत भाव (प्रतिक्विंटल)
– लाल कांदा – 600 ते 900 रुपये
– उन्हाळी कांदा – 900 ते 1200 रुपये
– पावसाने भिजलेला कांदा – 200 ते 400 रुपये
इतर बातम्याः