नाशिकः जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दीष्ट शंभर टक्के पूर्ण होण्याच्या दृष्टीने 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत मिशन ‘कवच कुंडल’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या उद्दीष्टपूर्तीसाठी सर्व यंत्रणांनी गावपातळीवर लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज मंगळवारी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. जिल्हाधिकारी सभागृह येथे आयोजित कोविड-19 लसीकरण जिल्हा कृतिदल समिती बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला उपजिल्हाधिकारी भूसंपादन गणेश मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शैलेश निकम, नाशिक महानगरपालिकेच्या माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.अजिता साळुंखे, महानगरपालिका मालेगाव माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अलका भावसार, जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नांदापूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी महेश पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, मिशन कवच कुंडल मोहिमेसाठी वेळेची मर्यादा लक्षात घेता अजून तीन दिवस हातात आहेत. आज येवला, सिन्नर व निफाड या तालुक्यांत रुग्णसंख्या वाढलेली आहे. या तिन्ही तालुक्यात व त्यांच्या सीमेवरील 14 गांवामध्ये लसीकरणाचे कॅम्पस आयोजित केल्यास निश्चितच त्यास चांगला प्रतिसाद मिळेल. मालेगाव शहरात लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी लसीकरणाबाबत स्थानिक प्रशासनाने व्यापक जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी मांढरे पुढे म्हणाले की, नवरात्र उत्सव जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. सप्तशृंगी गड वणी, चांदवड, इगतपुरी व ज्या ठिकाणी देवींची शक्तीपीठे आहेत, अशा ठिकाणी लसीकरण झालेल्या व्यक्तींना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे. परंतु इतर ठिकाणाहून आलेले लोक त्याठिकाणी केवळ दर्शनासाठी गर्दी करत आहेत. या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे व त्यासाठी पोलीस यंत्रणेचीही मदत घ्यावी, असेही मांढरे यांनी यावेळी सांगितले आहे. उद्दीष्टपूर्तीच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी नियोजनबध्द लसीकरण कार्यक्रम आखून प्रयत्न करावेत, अशाही सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उपस्थित अधिकारी यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दीष्ट शंभर टक्के पूर्ण होण्याच्या दृष्टीने 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत मिशन ‘कवच कुंडल’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या उद्दीष्टपूर्तीसाठी सर्व यंत्रणांनी गावपातळीवर लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करावे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक
इतर बातम्याः
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’; पुनुमिया पिता-पुत्राच्या नावे खरेदी, नाशिक पोलिसांकडून तपास सुरूhttps://t.co/uZBNeVFyOI#FormerMumbaiPoliceCommissionerParambirSingh|#AnonymousProperty|#SanjayPunumia|#AnonymousPropertyinSinnar
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2021