त्यांचं आजचं मरण उद्यावर ढकलणं सुरू; संजय राऊत असं का म्हणाले? संदर्भ काय?
पक्षातील होत असलेल्या गळतीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. डॅमेज कंट्रोलसाठी डॅमेज व्हावं लागतं. पण तसं काहीच नाही. काहीच गेलं नाही. कचरा गेला. शिंदे गटात कचरा गेला. यांना सर्वकाही दिलं.
नाशिक: शिवसेनेतून जे गेले ते डबक्यात गेले आहेत. डबक्यात बेडूक राहतात. डबक्याचं आयुष्य पावसापर्यंतच असतं. ते आता डराव डराव करतील. पाऊस गेल्यावर कुठे जाणार? हे सर्व भाजपमध्ये जाणार आहेत. त्यांना पर्यायच नाही. ते फक्त आजचं मरणं उद्यावर ढकलत आहेत. 16 आमदार अपात्र ठरणार आहेत. हे सर्वांना माहीत आहे. त्यांनाही माहीत आहे. त्यामुळेच ते आजचं मरण उद्यावर ढकलत आहे. त्यांना त्याशिवाय पर्याय नाही, असं विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं. सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा हवाला देऊन त्यांनी हे विधान केलं आहे.
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. शिंदे गटाचे 16 आमदार आधी अपात्र ठरतील. नंतर बाकीचे अपात्र ठरतील. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत कोर्टाचा निकाल लागला तर हे सरकार फेब्रुवारीचा पूर्ण महिना पाहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने होती. केवळ राजकीय विरोधकांना छळण्यासाठी अटक झाली. आताही काही येडेगबाळे म्हणतात याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू. यांच्या बापाचं राज्य आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
कुणाला तुरुंगात टाकायचं हे आताचे सत्ताधारी ठरवत आहेत. दीपक केसरकर एक बोलणार… नारायण राणे एक बोलणार… सर्वांची भाषा तुरुंगात टाकण्याची आहे. पण लक्षात ठेवा तुमचीही वेळ येईल. प्रत्येकाची वेळ येते.
आमचंही सरकार येईल. सूडाने वागू नका. सुडबुद्धीने जाणाऱ्यांना राजा म्हणत नाही. राक्षस म्हणतात. तुमचीही सत्ता जाईल. सत्तेचा अमरपट्टा कुणी घेऊन आलेलं नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.
शिवसेना एकच आहे. गटतट हे तात्पुरतं आहे. शिवसेना एकच आहे. एकच राहील. ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. त्यांच्यासोबत आम्ही आहोत, असं ते म्हणाले.
पक्षातील होत असलेल्या गळतीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. डॅमेज कंट्रोलसाठी डॅमेज व्हावं लागतं. पण तसं काहीच नाही. काहीच गेलं नाही. कचरा गेला. शिंदे गटात कचरा गेला. यांना सर्वकाही दिलं.
महापालिकेतील सर्वोच्च विरोधी पक्षनेतेपदही दिलं. सत्तेची पदे दिली. तरीही ते सोडून गेले. याचा अर्थ तुमच्या डीएनएमध्ये खोट आहे. बाहेरून आलेल्या माणसाला आणखी काय द्यावं पक्षाने? असा सवालही त्यांनी केला.