राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, संजय राऊत यांच्याकडून आपल्या खास शैलीतून भाजपचा समाचार; म्हणाले…
मालेगावातून उद्या महाराष्ट्रात संदेश जाईल. या देशात लोकशाही अजिबात राहिली नाही. विरोधी पक्ष संपून टाकायचा, लोकशाही नष्ट करायची, जे सत्य बोलतील त्यांना तपास यंत्रणेच्या माध्यमातून नष्ट करायचं असं दळभद्री राजकारण देशात आणि राज्यात सुरू आहे, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी निदर्शने होत आहे. केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. असा निर्णय घेणे हा लोकशाहीला मारक आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. राऊत यांनी आपल्या खास शैलीत भाजपचा समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणे हा लोकशाहीवरील अघात आहे. ही गुलामीची सुरुवात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. मालेगावात मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली ही गुलामीची सुरुवात आहे. मी अशा कृत्याला हिंदुत्व मानत नाही. मी अशा कृत्यांना देशभक्ती मानत नाही. लोकशाहीचे संरक्षण करणं किंवा चौकीदारीही मानत नाही. राहुल गांधींवरील कारवाई हा लोकशाहीवरील आघात आहे. आमच्यावरही मानहानीचा खटला सुरू आहे. पण इतक्या घाईने निर्णय देणारे न्यायालय हे पहिल्यांदाच पाहिलं. राहुल गांधींना धडा शिकवण्यासाठीच हा निर्णय घेतला. हा देश हुकूमशाहीकडे जाणारा आहे. कालच्या कारवायांमुळे राहुल गांधी यांचं नेतृत्व उजळून निघेल. जसं इंदिरा गांधी यांचं उजळलं, असं संजय राऊत म्हणाले.
लाखांची सभा होणार
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या मालेगावात सभा होत आहे. त्याच्या तयारीविषयीची माहितीही राऊत यांनी दिली. या सभेची उत्सुकता फक्त मालेगाव किंवा उत्तर महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे. अद्वैय हिरे शिवसेनेत प्रवेश त्यामुळे शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे. गद्दारी प्रकरण घडलं त्यानंतर या भागातील जनतेत चीड निर्माण झाली आहे. तो उद्रेक या सभेत दिसेल. लाखाची सभा होईल असं चित्रं आहे. सभेचा उत्साह पाहता या पेक्षाही मोठी गर्दी या सभेला होईल, असं राऊत यांनी सांगितलं.
लोकांमध्ये उत्साह
उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी त्यांचे विचार समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय परिस्थितीवरील त्यांचं भाष्य ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. लोकांमध्ये उत्साह आहे. लोकांचा उत्साह हीच खरी शिवसेना आहे. त्याचं स्वरुप, रुप हे मालेगावातील जनतेला पाहता येईल. उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी 5 वाजता येतील. शिवसेनेचे अनेक नेते येतील. सभा मालेगावात असली तरी ती अख्ख्या महाराष्ट्राची आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.