नाशिक : “काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून दोन चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. माझा स्पष्टपणे आरोप आहे, आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतू पुरस्कर, जाणीवपूर्वक एक षडयंत्र रचलं गेलं. त्याची स्क्रिप्ट तयार केली. त्याचा स्क्रिप्टचा पार्ट म्हणून माझ्या माणसाला बोलावलं. दहा-बारा तास बसवून ठेवलं. बंद पाकिटात फॉर्म दिले. ते फॉर्म चुकीचे दिले”, असा गंभीर आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विजयी आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केलाय. सत्यजीत तांबे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे आपले मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्याचं षडयंत्र होतं, असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये मोठी धुसफूस असल्याचं स्पष्ट झालंय.
“मला आता असं सांगत आहेत की, निर्णय तुम्हाला घ्यायचा होता की, कोण उभं राहणार? मग बरोबर साडेबारा वाजता दिल्लीतून माझ्या वडिलांची उमेदवारी का जाहीर करण्यात आली? महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव दिल्लीतून आलं नाही. मग एकच उमेदवारी दिल्लीतून का जाहीर झाली?”, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
“हा पूर्णपणे षडयंत्रचा पार्ट आहे. ही स्क्रिप्टेड स्टोरी होती. ती स्टोरी बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजित तांबेला उमेदवारी मिळू नये यासाठी, आमच्या परिवाराला पक्षाच्या बाहेर ढकलण्याचं षडयंत्र होतं”, असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला.
मला असं वाटतं की, एका बाजूला मला पक्ष संधी देऊ शकत नाहीय. संघटना संधी देऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या वडिलांना वाटलं की, तुझा पक्ष आणि संघटना तुला संधी देऊ शकत नसेल तर मीच काहीतरी केलं पाहिजे.
एक पित्याची भूमिका म्हणून त्यांनी मला निवडणुकीच्या 15 दिवस आधी फॉर्म जाहीर झाल्यानंतर सांगितलं की, सत्यजित मला असं वाटतं की ही निवडणूक तू लढायला पाहिजे. मला अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी सांगितलं, असं ते म्हणाले. पण मला वडिलांच्या जागेवर उभं राहायचं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला आम्ही चर्चा केली.
नंतर आम्ही आमच्या घरामध्ये चर्चा केली. थोरात साहेब होते, माझे वडील होते. आम्ही चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर आम्ही ठरवलं की, त्यांनी मला सांगितलं की सत्यजितने लढवावी, अशी चर्चा झाली.
आम्ही तशा पद्धतीचे निर्णय पक्षाला कळवला. फक्त माझी मानसिकता पूर्णपणे तयार झालेला नव्हता. त्यामुळे डॉक्टर लढतील की सत्यजित लढेल हे आपण शेवटच्या वेळी ठरवूया. तोपर्यंत आपण कुणाची उमेदवारी जाहीर करु नका, असं मी स्वत: एच के पाटील यांना सांगितलं. माझ्या वडिलांनी सांगितलं.
विधानसभेचे उमेदवार दिल्लीत ठरत असतात आणि यासाठी प्रभारी महत्त्वाचे असतात. त्यामुळे आम्ही सतत प्रभारींच्या संपर्कात होतो. फॉर्म भरण्याच्या एक दिवस आधी एच के पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी मान्य केलं.
आम्ही प्रदेश कार्यालयाला 9 जानेवारीला एबी फॉर्म पाहिजे म्हणून कॉल केला. त्यानुसार १० तारखेला माझा माणूस नागपूरला पोहोचला. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तो बसून राहिला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला. दोन एबी फॉर्म घेऊन पाठवतोय. विधान परिषदेचे एबी फॉर्म असल्याने ते सीलबंद होते.
11 तारखेला सकाळी माणूस पोहोचला. फॉर्म भरायला सुरुवात केली. पाकिट फोडलं तेव्हा चुकीचे एबी फॉर्म पाठवल्याचं समोर आलं. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे ते फॉर्म नव्हते.
एक औरंगाबादचा आणि दुसरा नागपूर शिक्षक मतदार संघाचा फॉर्म असल्याचं कळलं. एबी फॉर्मसारखा महत्त्वाचा मुद्दा एवढा प्रदेश कार्यालयानं गहाळपणे का करावा? विशेष म्हणजे या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्षांची सही आहे.
माझ्यावर आजपर्यंत इतका आरोप झाला. पण प्रदेश कार्यालयाने आपली चुक काय झाली हे का सांगितलं नाही. मी तातडीने निरोप दिला. पण नवा एबी फॉर्म आला तेव्हा त्यावर डॉ सुधीर तांबे यांचं नाव होतं आणि दुसऱ्या पर्यायावर नील असं लिहिलं होतं.
याचाच अर्थ या उमेदवाराच्या ऐवजी दुसरा उमेदवार टाकू शकत नाही हे क्लिअर होतं. जर इतकी मोठी गंभीर चूक प्रदेश कार्यालयाने केली तर याची जबाबदारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी प्रदेश काँग्रेसवर काय कारवाई करणार आहे? असा माझा प्रश्न आहे.