नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Padvidhar Election) काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अर्ज दाखल केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. सत्यजित तांबे यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर तांबे (Sushir Tambe) यांना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळालेली होती. असं असताना त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता आपल्या मुलाला पाठिंबा दिला. त्यामुळे खळबळ उडाली होती. सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल करणं ही भाजपची (BJP) खेळी असल्याचं मानलं जात होतं. कारण भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केलेला नव्हता. या सर्व घडामोडींदरम्यान सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पण या सर्व चर्चांवर सत्यजित तांबे यांनी आपली अधिकृत अशी कोणतीही भूमिका मांडली नव्हती. विशेष म्हणजे तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेस पक्षाकडून कारवाई देखील झाली. आता या सगळ्या घडामोडींनंतर सत्यजित तांबे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
सत्यजित तांबे, सुधीर तांबे यांची शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांच्यासोबत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी सत्यजित तांबे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली.
“मी गेले 22 वर्ष संघटनेच्या माध्यमातून या देशात काम करतोय. २००० साली मी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून कामाला सुरुवात केली. पुढे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये काम केलं. युवक काँग्रेसचा राज्य अध्यक्ष म्हणून चार वर्षे काम केलं. असं या देशातील एकही राज्य नाही जिथे मी काँग्रेस पक्षाच्या संघटनेचं काम केलेलं नाही”, असं सत्यजित तांबेव म्हणाले.
“या राज्यातील असा एकही तालुका नाही जिथे मी काँग्रेसचं काम केलेलं नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत मी काम केलंय. मित्र जमवण्याचं काम केलं. अनेक राजकीय संस्था आणि संघटनांवर मी काम करतोय. म्हणूनच कपिल पाटील यांच्या मनामध्ये गेली अनेक वर्ष होतं, खरंतर कपिल पाटील माझ्यासाठी विधानसभेचा मतदारसंघ शोधत होते”, अशी माहिती सत्यजित तांबे यांनी दिली.
“अनेकवेळा आमची चर्चा व्हायची. ते म्हणायचे की, तू इथून-तिथून उभं राहण्याचा प्रयत्न कर. पण राजकारण असतं. ते किती हे असतं हे आपण गेल्या चार-पाच दिवसांत टीव्हीवर पाहिलेलं आहे. खूप राजकारण झालंय त्या विषयावर आम्ही योग्यवेळी योग्य रितीने आम्ही बोलूच. आता सध्या राजकारणावर बोलणार नाही”, अशी भूमिका सत्यजित तांबे यांनी मांडली.
“माझ्या पंधरा-सोळा वर्षाच्या कालखंडात माझे वडील सुधीर तांबे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निमित्ताने समाजातील पदवीधरांसाठी जे काम केलंय, शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, खासगी संस्था असेल, प्रत्येक क्षेत्रात वडिलांनी केलं. ते काम आणखी ताकदीने पुढे नेण्याचं काम माझ्याकडून होईल”, असं आश्वासन सत्यजित तांबे यांनी दिलं.