नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विजयी उमेदवार सत्यजीत तांबे (SatyajeeT Tambe) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली. सत्यजीत यांनी निवडणुकीच्या काळात मौन राहणं पसंत केलं होतं. याशिवाय निवडून आल्यानंतरही आपण 4 तारखेला सविस्तर प्रतिक्रिया मांडू, असं सांगितलं होतं. अखेर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत रोखठोक भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेक आरोप केले. तसेच त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत असलेल्या जवळच्या संबंधांवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस आणि आपली अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. ते माझे मोठे बंधूसारखे आहेत. त्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, असं विधान सत्यजीत तांबे यांनी केलं.
मला जे द्यायचं आहे ते पक्षाने आणि संघटनेने द्यावं. माझ्या वडिलांच्या जागेवर मला संधी देऊ नये, असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. पण दुसरी कुठली संधी देणं शक्य नाही. तुझ्या वडिलांच्या जागेवर तू प्रयत्न कर असं ते म्हणाले. या गोष्टीला माझा पूर्णपणे विरोध होता. माझं एकच मत होतं की जे काही करायचं ते स्वत:च्या हिंमतीवर करायचं. स्वत: एखाद्या मतदारसंघात काम करायचं, स्वत: काहीतरी निर्माण करायचं, असं माझं मत होतं.
या सगळ्या दरम्यान पदवीधर निवडणूक जवळ आली. मी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिलं. त्यांनी वेळेअभावी आपण येऊ शकत नाही, असं पत्र पाठवून सांगितलं.
मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं. मी बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलावलं. कारण शहर विकास या मुद्द्यावर राजकारण बाजूला ठेवून यावर काम होणं गरजेचं आहे. त्यामुळे मी प्रामाणिकपणे सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलावलं. मी अजित पवार यांना बोलावलं होतं. त्यांना येण्याचं मान्य केलं होतं. पण शेवटच्या क्षणी येऊ शकले नाहीत.
देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला आले होते. त्यांनी भाषणात बोलताना सत्यजीतला संधी द्या. नाहीतर आमची त्याच्यावर नजर आहे, असं म्हटलं. त्यानंतर राजकारणात चर्चा सुरु झाली. आपण तो व्हिडीओ जरी पाहिला तर त्यांच्या एका वाक्यावर सभागृहात प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही भावना कार्यकर्त्यांची होती. सत्यजीत इतके वर्ष काम करत आहेत पण त्यांना संधी मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना होती.
खरंतर देवेंद्र फडणवीस आणि माझे संबंध अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यांना मी माझा मोठा भावासारखाच मानतो. त्याला कारण म्हणजे माझे दिवंगत बंधू राजीव राजळे हे ज्यावेळी २००४ ला पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांनी तरुण आमदारांचा युथ फोरम नावाचा ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपमध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा तरुण आमदार होते. त्यावेळी मी राजीव यांच्यासोबत कार्यक्रमाला जायचो. तिथे देवेंद्र फडणवीस देखील यायचे. त्यावेळी माझी आणि त्यांची ओळख झाली. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मला पहिल्यापासून राहिलं.
देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला आले. त्यांनी भूमिका मांडली. तेव्हापासून चर्चा सुरु झाली. त्यानंतर विधान परिषदेचं अधिवेशन आलं. त्यावेळीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. डॉक्टरसाहेब आता तुम्ही तुमच्या सुपुत्रांना संधी द्या, असं देवेंद्र यांनी स्पष्टपणे सांगितलं.
मला असं वाटतं की, एका बाजूला मला पक्ष संधी देऊ शकत नाहीय. संघटना संधी देऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या वडिलांना वाटलं की, तुझा पक्ष आणि संघटना तुला संधी देऊ शकत नसेल तर मीच काहीतरी केलं पाहिजे. एक पित्याची भूमिका म्हणून त्यांनी मला निवडणुकीच्या 15 दिवस आधी फॉर्म जाहीर झाल्यानंतर सांगितलं की, सत्यजित मला असं वाटतं की ही निवडणूक तू लढायला पाहिजे. मला अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी सांगितलं, असं ते म्हणाले. पण मला वडिलांच्या जागेवर उभं राहायचं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला आम्ही चर्चा केली.
नंतर आम्ही आमच्या घरामध्ये चर्चा केली. थोरात साहेब होते, माझे वडील होते. आम्ही चर्चा केली. चर्चा झाल्यानंतर आम्ही ठरवलं की, त्यांनी मला सांगितलं की सत्यजितने लढवावी, अशी चर्चा झाली. आम्ही तशा पद्धतीचे निर्णय पक्षाला कळवला. फक्त माझी मानसिकता पूर्णपणे तयार झालेला नव्हता. त्यामुळे डॉक्टर लढतील की सत्यजित लढेल हे आपण शेवटच्या वेळी ठरवूया. तोपर्यंत आपण कुणाची उमेदवारी जाहीर करु नका, असं मी स्वत: एच के पाटील यांना सांगितलं. माझ्या वडिलांनी सांगितलं.
विधानसभेचे उमेदवार दिल्लीत ठरत असतात आणि यासाठी प्रभारी महत्त्वाचे असतात. त्यामुळे आम्ही सतत प्रभारींच्या संपर्कात होते. फॉर्म भरण्याच्या एक दिवस आधी एच के पाटील यांच्यसोबत चर्चा झाली. त्यांनी मान्य केलं.]
आमच्या परिवाराला 2030 साली 100 वर्षे पूर्ण होतील. आम्ही किती निष्ठेने पक्षासाठी काम केलं हे आम्ही वारंवार सांगत आलोय. मी 2000 सालापासून काँग्रेस पक्षात काम करतोय. 2007 ते 2017 दहा वर्षे मला जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आमचेस तत्कालीन युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांनी मला विद्यार्थी चळवळीतून युवक काँग्रेसमध्ये आणलं.
आम्ही 2011 ची विद्यार्थी निवडणूक आमचे नेते राहुल गांधी यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढलो. 2014 ची युवक काँग्रेसची निवडणूक लढलो. दोन्ही निवडणुकींमध्ये मला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली म्हणून मी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर 2018 ला पुन्हा एकदा युवक काँग्रेसची निवडणूक लढलो आणि युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली.
2018 चा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो तेव्हा राज्यातील काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती. त्यावेळच्या परिस्थितीत मी युवक काँग्रेसमध्ये काम केलं आणि अनेक उपक्रम राबवले. मी युवक काँग्रेसमध्ये अनेक कामं केली, ज्याची दखल माझ्या पक्षश्रेष्ठींनीदेखील घेतली. सार्वजनिक, खासगी आणि अनेक पद्धतीने त्यांनी मला पाठीवर थाप मारण्याचं काम केलं. माझी युवक काँग्रेस अध्यक्षपदाची कारकीर्द 2022 साली संपली.
खरंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाला तेव्हा कार्यकर्त्यांचं मनोबल खचलेलं होतं. त्यावेळेला मी पहिला कार्यकर्ता होतो ज्याने सर्व पदाधिकाऱ्यांची दादरला टिळक भवनला बैठक घेतली होती. आम्ही युवकच काँग्रेसला पुढे कसं आणू शकतो यावर चर्चा झाली. त्यानंतर 2019 ची विधानसभा निवडणूक कशी लढायची यावर आम्ही काम चालू केलं. सुपर 60 सारखा प्रयोग केला. या माध्यमातून 44 पैकी 28 जागा निवडून आणण्याच युवक काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे.
युवक काँग्रेसमध्ये मी अतिशय प्रमाणिकपणे काम केलं. मी असा कार्यकर्ता आहे की, माझ्यावर पूर्ण देशामध्ये झालेल्या विविध आंदोलनातून 50 केसेस दाखल झाले. माझा पासपोर्ट मला मिळत नव्हते. आता राज्य शासनाने जीआर काढला, केसेस मागे घेतल्या. तेव्हा मला पासपोर्ट मिळाला.
काँग्रेसमध्ये एक प्रथा कायम राहिलेली आहे की, जो प्रदेशाध्यक्ष असेल किंवा राष्ट्रीय अध्यक्ष असतो, तो ज्यावेळेस पदावरुन जातो तेव्हा त्याला विधानसभा किंवा विधान परिषदेची संधी देण्याचं काम केलं जातं. राष्ट्रीय पातळीवर जो काम करतो त्याला राज्यसभेत घेतात. राज्य पातळीवर जो काम करतो त्याला विधान परिषदेत घेतात.