चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच टीका केली आहे. तसेच त्यांनी अपक्ष आमदार म्हणूनच काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, तांबे यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. भुजबळ यांच्या विधानामुळे अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.
मी इतकी वर्ष झाली, राजकारणात आहे. पण अशा प्रकारे एबी फॉर्म कोण घेतं आणि फॉर्म घेताना पाहत नाही, हे चुकीचं आहे. फॉर्म घेताना सर्व काही पाहिलं जातं. त्यामुळे हे असं कसं झालं? सत्यजित तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत. यावर आता बाळासाहेब थोरात साहेबांनी बोललं पाहिजे. खरं काय झालं हे थोरात साहेबच सांगू शकतात, असं माझं म्हणणं आहे, असं सांगतानाच जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यावरून मला वाटतं की, सत्यजित तांबे काँगेसमध्ये परतणार नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
डॉ. सुधीर तांबे हे तीन वेळा निवडून आले आहेत. त्यांनी मतदार संघात चांगले काम केलं आहे. दोन महिन्यांपूर्वी आम्ही त्यांना म्हणालो, तुम्हालाच निवडून देऊ. पण निश्चित काँग्रेसमध्ये काय झालं, हे कळायला मार्ग नाही. ऐनवेळी जे झालं, ते विचित्र आहे. याच्यात कोण दोषी आहे, याचा उलगडा अजून झाला नाही, असं भुजबळ म्हणाले.
शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं, हा घरातला प्रश्न सोडवला पाहिजे. त्यांनतर शिवसेना आणि महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. शुभांगी पाटील यांना चांगली मते मिळाली. ती काही कमी मते नाहीत. महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे. पण तांबेंनी मतदार नोंदणी चांगली केली होती. त्याचा परिणाम त्यांच्या विजयात झाला, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणूक निकालावरही भाष्य केलं. नागपूर आणि अमरावतीमध्ये जो कौल आला, त्यावरून स्पष्टपणे कळतं की, हवा बदलली आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं.
तसेच कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलाही फोन केला होता. महाविकास आघाडीचे शीर्षस्थ नेते शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे बघतील काय करायचं ते. सर्व प्रमुख नेते बसून मार्ग काढतील, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरही भाष्य केलं. मला त्यांचं वक्तव्य माहित नाही. पण शिवाजी महाराज यांनी अन्याया विरोधात लढा दिला. जर औरंगजेब वगैरे नसते, तर त्यांच्या जागी कुणीतरी जुलमी राज्यकर्ते असतेच ना. मला असं वाटतं की आव्हाड यांचे बोलण्यात काही पुढं मागं झालं असण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सांगितलं.