माझी पक्षाविषयी नाराजी केव्हा दूर होईल?, आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलं
अपक्ष आमदार तांबे म्हणाले की, माझे कोणाशी मतभेद नाहीत. त्यामुळे ते दूर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
नाशिक : नाशिकचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यावेळी पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केलं. काँग्रेसने त्यांच्याबाबत घेतलेल्या या भूमिकेमुळे तांबे अजूनही नाराज असल्याचे दिसून येत आहे. याबाबत स्वतः तांबेंनी कराड येथे आज आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय घडामोडीवर मोठे विधान केले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी साताऱ्यात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी शासकीय विश्रामगृहात चर्चा केली. त्यानंतर आज कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास भेट देत अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
माझे कोणाशी मतभेद नाहीत
यावेळी अपक्ष आमदार तांबे म्हणाले की, माझे कोणाशी मतभेद नाहीत. त्यामुळे ते दूर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझी नाराजी तेव्हाच दूर होईल जेव्हा मला कोण चर्चेला बोलवेल. मला जर चर्चेलाच बोलावलं नसेल तर माझी नाराजी दूर कशी होईल?
आम्ही काँग्रेसमध्ये काम करणारी लोकं
निवडणुकीच्या काळात ज्या घटना घडल्या. त्याबाबत मी वारंवार त्या त्या वेळी सांगितल्या आहेत. त्याला काही ठरावीक लोकांनी जे गैरसमज निर्माण केले. त्याच्यातून पक्षाने माझ्यावर कारवाई केली. आणि पक्षाने मला बाहेर काढलं. परंतु शेवटी आम्ही पिढ्यानपिढ्या काँग्रेस पक्षात काम करणारी लोक आहोत.
काँग्रेसमध्ये आमच्या कुटुंबाला शंभर वर्षे
शंभर वर्षे आमच्या कुटुंबाला काँग्रेसमध्ये होत आहेत. माझी देखील 10 ते 20 वर्षे हे विद्यार्थी ते युवक चळवळीपासून काँग्रेसमध्ये गेली आहेत. त्यामुळे आम्हाला दुखवण्याचा प्रयत्न काही ठराविक लोकांकडून झाला. त्याच्या विरुद्ध आमची लढाई होती. ती अजून चालूच असल्याचे तांबे यांनी यावेळी म्हंटले.
अजूनही नाराज असल्याचे सांगितले
काँग्रेससोबत बंडखोरी केल्याचा ठपका आमदार सत्यजित तांबे यांच्यावर ठेवला जात आहे. मात्र, कराड येथे माध्यमांशी संवाद साधत असताना सत्यजित तांबे यांनी आपण अजूनही नाराजच असल्याचे सांगितले आहे.